चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पुन्हा भाजपाचा झेंडा फडकेल

- केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांचा विश्‍वास
- हमालाच्या घरी पुरी यांनी घेतला भोजनाचा आस्वाद

    दिनांक :23-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
चंद्रपूर, 
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात (Lok Sabha constituency) येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजयी झेंडा पुन्हा एकदा फडकेल, असा विश्‍वास भारत सरकारचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी व्यक्त केला.
 
Lok Sabha constituency
 
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या संघटनात्मक बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते संबोधित करीत होते. यावेळी राज्याचे वन व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, हरीश शर्मा, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेश बकाने, सुदर्शन निमकर आदींची उपस्थिती होती.
 
 
यावेळी हरदीपसिंह पुरी यांनी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच यांच्याशी संवाद साधला. तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयांना त्यांनी मालार्पण करत अभिवादन केले. यादरम्यान तिलक वार्ड बल्लारपूर येथील रामहित वर्मा या हमाल काम करणार्‍या व्यक्तीच्या घरी पुरी यांनी भोजनाचा आस्वाद घेतला व त्यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. यावेळी सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनीदेखील भोजन केले.
 
 
मुनगंटीवार यांनी रामहित वर्मा यांच्या कुटूंबियांना दहा हजार रुपये किंमतीचा कुकींग सेट भेट दिला. बल्लारपूर येथील खांडक्या बलाळशाह या गोंडराज्याच्या समाधी स्थळी भेट देत पुरी यांनी अभिवादन केले. देशातील अत्याधुनिक अशा सैनिक शाळेला हरदीपसिंह पुरी यांनी भेट दिली व पाहणी केली. या सैनिक शाळेचे एकूणच स्वरूप भव्य व नेत्रदीपक असून, देशाच्या संरक्षणाच्या प्रक्रियेत ही सैनिक शाळा मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन पुरी यांनी केले. या सैनिक शाळेच्या निर्मीतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल मुनगंटीवार यांचे त्यांनी अभिनंदन व कौतुक केले.
 
 
केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ घ्या
केंद्र सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना राज्यांमार्फत चालविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मात्र, यात काही अडचणी निर्माण होत असतील, तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून संबंधित यंत्रणेशी बोलून त्या सोडविल्या जातील व त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल, असे प्रतिपादन हरदीपसिंग पुरी यांनी केले. नियोजन सभागृहात केंद्रीय योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम आदी उपस्थित होते.