तळेगावात तळ्यातील देवीचा देखाव्याचे काम सुरू

- 40 वर्षापासून जपली जातेय गावाची संस्कृती

    दिनांक :23-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
नवरात्रोत्सव (Navratri Festival) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी देवीचे देखावे साकारण्यात येत आहे. मात्र तळेगाव टालाटुले येथील तळ्यातील पाण्यावर 40 वर्षापासून देवीचा देखावा साकारण्यात येत आहे. येथे 20 फूट पाण्यावर देवीची स्थापना करण्यात येते. गावाच्या संस्कृतीचा हा एक भाग झाल्याने गत 40 वर्षापासून हि परंपरा कायम आहे.
 
Navratri Festival
 
गावात जवळपास पंधरा एकरात तळे निर्माण करण्यात आले आहे. तळ्याच्या शेजारी मंदिर आहे. मंदिरात देवीची स्थापना करण्यात येत होती. मात्र, देवीच्या देखाव्याच्या स्पर्धेत तळ्यात देवी स्थापन करण्याची कल्पना मंडळातील युवकांना 40 वर्षापूर्वी सुचली. सुरुवातीच्या काळात भक्तांना दर्शन घेण्यासाठी देवीच्या मंदिरापर्यंत एक लांब लाकडी पूल बांधण्यात आला होता. परंतु, दिवसेंदिवस कमी पडू लागलेल्या मानवी श्रमामुळे पाण्यावर तरंगते एक मंदिर बनवण्यात आले. देवीच्या दर्शनासाठी एक बोट सुद्धा तयार करण्यात आली आहे. तलावातील देवी म्हणून या गावाची एक वेगळी ओळख या जिल्ह्यात निर्माण झाली आहे. गावाच्या पश्चिमेला प्राचीन काळातील हेमाडपंती भवानी मंदिर आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरात जिल्ह्यातून भाविक येतात. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.