विरोधकांचा कंठशोष व मेगा पोलिस भरती!

    दिनांक :23-Sep-2022
|
वेध
- संजय रामगिरवार
देशात, राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा कंठशोष विरोधी पक्ष करीत असतानाच बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 75 हजार Police Recruitment पोलिसांच्या भरतीची घोषणा झाली, हा शुभसंकेत आहे. या भरतीची प्रक्रिया वेगाने व्हावी; त्याचबरोबर ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी, असा आदेशही शिंदे-फडणवीस सरकारने दिला. खरे तर, पोलिस विभागात नव्या भरतीची नितांत आवश्यकता होतीच. रिक्त पदांमुळे पोलिसांवर होणारा कर्तव्याचा ताण त्यांच्या चेहर्‍यावर आणि पर्यायाने स्वभावातही दिसून येत आहे. ‘मी आपली काय मदत करू शकतो’ अशी पाटी पोलिस ठाण्याच्या दारावर बघून तक्रारदार मोठ्या आशेने आत जातो खरा; मात्र दोन शिव्या खाऊनच तो बाहेर पडतो, हा सर्वसामान्य जनतेचा सार्वत्रिक अनुभव आहे. धाकदपट करण्याची पोलिसांची परंपरागत पद्धत अद्याप कायम आहे, याचा प्रत्ययही वारंवार येतो. कामाचा प्रचंड ताण हा या स्वभावाचे एक कारण असू शकते. त्यांना पुरेसा आराम मिळत नसल्याने हे घडत असावे, असे गृहीत धरले तर त्यावरही दिलासा देणारी घोषणा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली गेली. पोलिसांच्या नैमित्तिक सुट्या वाढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आतापर्यंत पोलिसांना मिळणार्‍या 12 सुट्यांमध्ये वाढ करून त्या आता 20 करण्यात आल्या आहेत.
 
  
Police Recruitment
 
बेरोजगारी वाढत आहे आणि सरकार झोपले आहे, अशा आशयाची ओरड विरोधकांच्या ठेवणीतली असते. ती कधीही वापरता येते. कारण शासकीय नोकर भरती एव्हाना दुर्मिळ झाली आहे. खाजगी प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. नुकताच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. तो कुणामुळे गेला या वादात पडले नाही तरी त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे, हे नाकारता येत नाही. बेरोजगारी हा गंभीर मुद्दा आहेच; तो कसा हाताळायचा, याचा विचार सरकार म्हणून झालाच पाहिजे. शिंदे-फडणवीस सरकार याचा विचार करीत असल्याचे या मेगा भरतीच्या घोषणेवरून दिसते. या भरतीसाठी येत्या बुधवारी एका विशेष संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. रेल्वे आणि केंद्रीय परीक्षेच्या धर्तीवर या भरतीची परीक्षा होणार आहे. यंदा भरतीत एकही आरोप होता कामा नये, असे नियोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यासोबतच भरतीच्या वेळी इच्छुक तरुणांची गैरसोय होऊ नये, यावरही विचार होणे गरजेचे आहे.
 
 
जिल्हास्थानी भरतीच्या वेळी जनतेसमोर उभे ठाकणारे चित्र तसे चांगले नाही. कुणीतरी रात्री उशिरा वाढलेले खाद्यान्न ग्रहण करून रस्त्यावरच रात्र काढणारे तरुण प्रत्येक भरतीच्या वेळी दिसतात. शहरातील सेवाभावी संस्था थोड्या फार प्रमाणात मदतीसाठी पुढे सरसावतात हे खरे असले, तरी त्यांचाही उद्देश दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात बातमी झळकणे, एवढाच असतो. अगदी भरतीपासून सुरू होणारी हेटाळणी आणि अव्यवस्थेची सवय मग त्या पोलिसांच्या जीवनातील स्थायी भाव होऊन जातो. अधिकार्‍यांचा मोठा दबाव आणि कामाचा ताण तसेच सणावारांना न मिळणार्‍या सुट्या त्यांचा स्वभाव चिडचिडा करण्यास कारणीभूत ठरतो. अखेर त्याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसतो, हेही समजून घेतले पाहिजे. असे असले तरी Police Recruitment पोलिस विभागातील नोकरी केवळ रोजगार नसून ते समाजसेवेचे व्रत आहे, हे जाणूनच आणि त्यातून होणारा मन:स्ताप सहन करण्याची तयारी ठेवूनच इच्छुक तरुणांनी याकडे आले पाहिजे, हेही तेवढेच खरे आहे. एकीकडे बेरोजगारी आहे म्हणून बेंबीच्या देठापासून ओरड करायची आणि सरकारने रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला की, त्यावरही आक्षेपांच्या फैरी झाडत सुटायचे, याचा प्रत्यय ‘अग्निवीर’ दरम्यान जनतेने घेतला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी मी विरोधाला विरोध करणार नाही, असे शरद पवार यांचे आलेले वक्तव्य एका परिपक्व राजकारणाचे उदाहरण म्हणता येईल. त्यामुळे यापुढे येणार्‍या रोजगाराच्या संधी महाराष्ट्रातच कशा रुजतील, याचा प्रयत्न सर्वांकडून होणे अपेक्षित आहे. 
 
- 9881717832