आर्वी शहरात आढळला डायनासोर सारखा दुर्मिळ सरडा

    दिनांक :23-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
आर्वी , 
'गिरगीट (Lizard) की तरह रंग बदलते हो तुम,’ असे एखाद्याला आपण म्हणतो. असा हा रंग बदलण्यात माहीर असलेला गिरगीट अर्थात शामेलियन नावाचा दुर्मीळ सरडा आर्वी शहरात पाहायला मिळाला. आर्वी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसरातून रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.
 
Lizard
 
सरडा (Lizard) प्रजातीत मोडणारा शामेलियन हा ओबडधोबड दिसणारा प्राणी ज्युरासिक पार्कच्या डायनासोरशी साधर्म्य साधणारा आहे. नागरिकांना तो आर्वी येथील आठवडी बाजार परिसरात असलेल्या उपविभ ागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यावर दिसून आला. सामान्यत: सरडा पाहिल्यावर कुणाला आश्चर्य वाटणार नाही. पण, शामेलियनच्या रूपामुळे तो भीतीदायकही वाटतो. त्यामुळे नागरिकांनी पीपल्स फॉर अनिमल्सचे प्राणीमित्र रुपेश कैलाखे यांना माहिती दिली. प्राणी मित्र रुपेश कैलाखे, मनिष ठाकरे, गौतम पोहणे, संकेत मनोरे यांनी घटनास्थळी जाऊन या सरड्याला ताब्यात घेऊन वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. शामेलियन हा अतिशय शांत व बिनविषारी जीव आहे. भारतभर सरड्याच्या प्रजाती आढळतात. शेतात, परसबागेत, रस्त्यावर, झाडांवर तो सहज दिसतो. पण, शामेलियन त्यांच्यापेक्षा वेगळा आहे.
 
 
शामेलियन मुख्यत्वे आफ्रिका, दक्षिण युरोप, दक्षिण आशिया व श्रीलंकेत आढळतो. मात्र, तो भारतात आढळणार्‍या इतर प्रजातीपेक्षा वेगळा आहे. त्याच्या दिसण्यापासून ते असण्यापर्यंत. खडबडीत शरीर, चपट्या केल्यासारख्या बगला, एकावर एक तीन शारस्त्राण घातल्यासारखं डोकं, कडबोळ्यासारखी वळलेले शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय आहेत. तो सहसा झाडावरच राहतो. तहान लागल्यावर पानावर पडलेले दवबिंदू पितो. मात्र सरड्याची मादी जमीन उकरून त्यात अंडी घालते. शामेलियनची जीभ म्हणजे त्याचे शस्त्र. आठ ते नऊ इंच लांब गुलाबीसर जिभ आपल्या चिकट टोकाने भक्षाला खेचून घेते. किडे हे त्याचे खाद्य आहे. डोळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते शंकुप्रमाणे स्वतंत्र वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. रंग बदलणे ही त्याची मोठी क्षमता. शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याला मिळालेली ही देगणी. शरिरातल्या रंगपेशी शक्यतो सभोवतालच्या रंगानुरूप हुबेहूब रंग धारण करण्याची क्षमता त्यांच्यात असते अशी माहिती प्राणीमित्र मनिष ठाकरे यांनी दिली.