राजुरा तालुक्यात 15 गावातील जनावरांचे लसीकरण

- जनावरांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

    दिनांक :23-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
चंद्रपूर, 
लम्पी (Lumpy) रोगाने राजुरा तालुक्यातील जनावरांना विळखा घातला रामपूर आणि आर्वी येथील जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे आढळली आहेत. रामपूर येथे 3 आणि आर्वी येथे 4 जनावरांना लम्पी रोगाची बाधा झाल्याचे आढळून आल्याने जनावरांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तत्पूर्वी बाधित क्षेत्रातील आणि पाच किलोमीटर परिघातील एकूण 15 गावातील जनावरांना निःशुल्क लसीकरण करण्यात आले.
 
Lumpy
 
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुचिता धांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रमोद जल्लेवार यांनी रामपूर आणि आर्वी येथील जनावरांची तपासणी केली. यावेळी तहसीलदार हरीष गाडे आणि गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांचे सहकार्य लाभले. लसीकरण मोहिमेत पशुधन पर्यवेक्षक कैलाश राठोड, रंजीता मेडपल्लिवार, चारुता पेंढारकर, सूरज गेडाम, सुभाष आकुलवार, संदीप आडे, मोरेश्वर बुरांडे, परिचर वाढई, वंजारी, तामगाडगे शेडमाके, माधव राठोड, हुसेन, तसेच तालुक्यात पशुवैद्यकीय संस्थांना सेवा देणारे आदित्य बोबडे, निमकर, श्रेया पळसपगार, साक्षी बारापात्रे, शंकर वाढई, अजिंक्य रामटेके, अनिल चव्हाण आदींनी 15 गावांमध्ये एका दिवशी लसीकरण करण्यास सहकार्य केले.
 
 
लम्पी चर्मरोगाची लक्षणे
ताप येणे, चारा कमी खाणे, पाणी कमी पिणे, दूध उत्पादनात घट, त्वचेवर गाठी येणे, डोळ्यातून नाकातून स्त्राव वाहणे, लासिकाग्रंथिंना सूज येणे अशा प्रकारची प्रकाराची लम्पी (Lumpy) चर्मरोगाची लक्षणे आढळून येतात. गोठ्यातील स्वच्छता आणि या रोगाचे मूळ असणारे गोचीड, चावणार्‍या गोमाशा, चिलटे, डास यांच्यावर नियंत्रण केल्यास रोग प्रसारास अटकाव होईल. तसेच व्यवस्थित नियोजन केल्यास रोगावर नियंत्रण मिळू शकते.