अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी 364 कोटी रुपयांचा निधी प्राप्त

- तहसील प्रशासनामार्फत लवकरच होणार शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा

    दिनांक :23-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस, पुराने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामात अनेक शेतकर्‍यांची (Farmers) शेती पडिक राहिली. शेतात गाळ साचला, काही शेती खरडून निघाली. या नुकसानीच्या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना मदत देण्याची मागणी करण्यात येत असतानाच शासनाने मदत जाहीर केली होती. शासनाने जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी 364 कोटी 65 लाख 91 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी तहसील प्रशासनाला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ही मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
 
Farmers
 
खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या अनियमीततेचा फटका शेतीला (Farmers) बसला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तर मुसळधार पाऊस, वारंवार झालेली अतिवृष्टी, सततच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामात जिल्ह्यातील 2 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. यामध्ये 2 लाख 32 हजार 646 शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागले आहे. प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने 364 कोटी 65 लाख 91 हजार रुपयांच्या मदतनिधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. याबाबत राज्य सरकारने 8 सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढत मदतीचा प्रस्ताव मंजूर केला होता. हा निधी तालुकानिहाय तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येत आहे. अतिवृष्टीने 2 लाख 53 हजार 823.18 हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाले आहे.
 
 
पुरामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून निघाल्या. अनेक शेतात गाळही साचला. त्यामुळे पिकांचे, शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना खरडून निघालेल्या, गाळ साचलेल्या क्षेत्राकरिता मदत देण्यात येत आहे. जिल्ह्यात 4 हजार 279.68 हेक्टर शेतजमीन खरडून निघाली आहे. 2 हजार 142.82 हेक्टर क्षेत्रात गाळ साचला. खरडून आणि गाळ साचल्याने 6 हजार 523.02 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. याकरिता 18 कोटी 66 लाख 32 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.