मानव जीवन : एक चिंतन

    दिनांक :23-Sep-2022
|
जीवन जिज्ञासा
- प्राचार्य प्र. श्री. डोरले
परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये human life मानव योनी ही सर्वश्रेष्ठ समजली गेली आहे. सर्व देशांमध्ये नरदेह हा सर्वोत्कृष्टच नव्हे, तर अतिशय दुर्लभ म्हणून सर्व संतांनी वाखाणला आहे. या नरदेहाच्या साह्याने जन्म मरण परंपरा खण्डित होते, यमयातनेचे दुःख नष्ट होते, जीवनाचे सार्थक होते म्हणजे जीवनाचा विकास होतो, उत्तम गती प्राप्त होते. नरदेहाच्या माहात्म्याने भारावलेले श्रीसमर्थ तर म्हणतात- ‘ऐसा हा नरदेह विख्यात- काय म्हणौनि वर्णावा।’ ते केवळ आश्चर्य व्यक्त करूनच थांबले नाहीत तर हा देह ‘परोपकारी झिजवून- कीर्तिरूप उरवावा।’ असा आग्रहही त्यांनी धरला आहे. या नरदेहाच्या एकूण वाटचालीला आपण मानवी जीवन या नावाने संबोधतो. अशा या मानवी जीवनाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करू.
 
 
bhagwat-geeta
 
मानवी जीवन-धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र
प्रत्येक human life मानवाच्या जीवन प्रवासाचा प्रारंभबिंदू हा त्याच्या जन्मापासूनच असतो आणि पेटलेल्या चितेवर त्याचा शेवट असतो. त्याला आपण मृत्यू म्हणतो. भगवद्गीतेच्या तात्त्विक परिभाषेत या अपरिहार्यतेचे वर्णन - ‘अव्यक्तादिनी भूतानि व्यक्तमध्यानि भारत’ असे केले आहे. जन्म म्हणजे अव्यक्तातून व्यक्त होणे आणि मृत्यू म्हणजे व्यक्तातून अव्यक्तात जाणे. मधल्या अवस्थेला आपण ‘जीवन’ म्हणतो. ते प्रत्येकाला जगावेच लागते. जगणे हे अपरिहार्य असते. त्यातून सुटका नसते. या अपरिहार्यतेला भारतीय तत्त्वज्ञानात ‘जन्म मरण परंपरा’ असे म्हटले आहे. श्रीमत् आचार्य शंकरांनी यालाच ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं। पुनरपि जननी जठरे शयनम्॥’ असे वर्णिले आहे. त्यातून सुटका नाही आणि दुसरा पर्यायही नाही. ‘नांन्य पंथ: विद्यते अयनाय’ असे उपनिषदकारांनीही म्हटले आहे. ‘चरवैति चरवैति’ इतकेच आपल्या हातात असते. ही वस्तुस्थिती आहे आणि जगातील विचारवंतांनी, तत्त्वज्ञांनी ती मान्यही केली आहे. एक तत्त्वज्ञानी म्हणतात- ‘नेकेड अँड एम्प्टी हँडेड यु केम हिअर. एम्प्टी हँडेड अँड नेकेड यु डिपार्ट-रिझल्टस्? नथिंग... सिम्पली ट्रेडिंग द व्हील.’ जगण्याला केंद्रिभूत करून सुखाच्या आशेने मरेपर्यंत ‘कोलू ओढत’ राहणे. बस् इतकेच आपल्या हातात असते.
 
 
 
ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे. या संपूर्ण जड-सजीव सृष्टीचा विकासक्रम त्याने आखून दिलेल्या नियतक्रमाने म्हणजे ‘अ‍ॅकॉर्डिंगली नॅचरल लॉज’नीच होतो. आधुनिक विज्ञानातील अनेक शास्त्र शाखांनी विशेषतः ‘स्पेस सायन्स’ने तर हे अधिकच स्पष्ट केले आहे. यालाच तत्त्वज्ञानाच्या भाषेत ‘डिटरमिनिझम’ असे म्हणतात. भारतीय परंपरागत वाटचालीत ही संकल्पना आपण ‘नियती’ या शब्दाने व्यक्त करतो. परमेश्वर दयाळू आहे. भूतलावर पाठविण्यात आलेल्या प्रत्येक जीवात्म्यासोबत त्याने आईच्या वात्सल्याने आणि पित्याच्या मायेने जीवनाच्या वाटचालीसाठी एक ‘प्रारब्ध आणि संचिताची शिदोरी ज्याला आपण ‘पाथेय’ म्हणतो ती बांधून दिली आहे. ते ‘पाथेय’ त्याला आयुष्यभर पुरते. जे उरते त्याला आपण ‘क्रियमाण’ म्हणतो. ‘प्रारब्ध-क्रियमाण-संचित ही मानवी जीवनाची ‘ब्ल्यू प्रिंट’ आहे. त्याच्याप्रमाणेच त्याची वाटचाल होत असते. त्यामुळेच संपूर्ण human life मानव समाजात मानवी जीवनाचे वैविध्य दिसून पडते. एकाच जमिनीतून उगवणार्‍या विविध रोपट्यांना असे भिन्न भिन्न रंगांची फुले येतात. त्याप्रमाणे मानवसृष्टीमध्येदेखील human life मानवी जीवनाचे विविध आकार प्रकार आणि स्वभावांचे वैशिष्ट्य पाहावयास मिळतात.
 
 
human life मानवी जीवनाचे स्वरूप ‘द्वंद्वात्मक’ आहे. द्वंद्व म्हणजे संघर्ष. म्हणून योगी अरविंद यांनी जीवनाला कुरुक्षेत्राची उपमा दिली आहे. हा जीवनपथ आपण समजतो तसा सोपा, सरळ नाही. या वाटचालीत खाचखळगे आहेत. कंटकाकीर्णत्व आहे. बुडविणारे डोह आहे. रक्तबंबाळ करणार्‍या काटेरी वेली आहेत. दमछाक करणारी चढण आहे. मदतीचा हात देणारे कमी आहेत; उलट मार्गावरून ढकलून देणारे अनेक आहेत. ईर्षा, द्वेष, मत्सर, विकृत जीवघेण्या स्पर्धाळू वृत्तींचा नंगानाच अखंडपणे या वाटेवर चालत असतो. वाळवंटातील ‘ओयॅसिस’प्रमाणे काही सुखावणारे, दिलासा देणारे, शीतल छाया देणारे, श्रांत मनाला शांत करणारे, पाणवठ्यांचे सुखद व थंड सावली देणारे थांबेही आहेत. पण उर्वरित भागात मात्र रखरखणारे, क्षितिजापल्याड पसरलेले, घामाने आणि तहानेने व्याकूळ करणारे, निसर्गातील एक चमत्कार म्हणून गौरविल्या जाणारे पण आभासी, खोटे, फसविणारे आणि धगधगीत ‘असत्य’ असणारे मृगजळही आहे. जीवनाची वाटचाल करणार्‍या प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात नव्हे, अधिकांश प्रमाणात याची अनुभूती घ्यावीच लागते. हीच खरी जीवनाची अपरिहार्यता आहे. पण गंमत अशी आहे की, ही ‘अपरिहार्यताच’ आपल्याला जीवन म्हणजे काय? जीवन कशाला म्हणतात? याचा अर्थ समजावून देतात. जर त्या जीवन प्रवासाचे, त्यातील विविध अनुभवांचे ‘चिंतन’ केले तर! ते चिंतन करणे आवश्यक असते. कारण त्यातूनच खरे जीवन आपल्याला कळत असते. नाही तर जीवन म्हणजे काय असते? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगात भेटीला आलेल्या पत्नीला म्हटल्याप्रमाणे ‘चार काड्या जमवून घरटे तयार करणे, काही पिलांना जन्म देणे आणि संपणे किंवा वणव्यात होरपळून मरणे.’ पण मानवाला परमेश्वराने कर्मस्वातंत्र्य दिले आहे. मनन, चिंतन, निदिध्यासनाची क्षमता दिली आहे. त्याचा जर नीट विवेकाने वापर केला तर जीवनाची जड स्वरूप ‘शोकांतिका’ होत नाही तर त्याची ‘चिंतनिका’ होते. प्रत्येक व्यक्ती समाजाचा घटक आहे. समाज राष्ट्राचे अंग आहे. प्रत्येक समाजाचा, राष्ट्राचा एक धर्म असतो. संस्कृती असते. परंपरा असते. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या human life जीवनात वरील व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय स्तरावरील घटनांचे साद-प्रतिसाद हे उमटतातच. त्याबद्दल स्वत:वर झालेली प्रतिक्रिया विविध प्रकारे प्रकट होतच असते. कथा, काव्य, कादंबरी, नाटक, त्यातील विविध पात्रांच्या माध्यमातून जीवनानुभूतींचा पट रंगत जातो. याचे चपखल उदाहरण म्हणजे महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेतून प्रकट झालेले महाकाव्य ‘महाभारत’ होय. मानवी जीवनाच्या चिंतनातून ‘साहित्य’ प्रकट होते आणि अशा प्रकारच्या साहित्य चिंतनातून मानवी जीवन चिंतनशील होते. जीवनमूल्यांची पाळेमुळे अधिकाधिक खोलभर रुजतात.
 
 
human life जीवन शिकण्यासाठी ते जगावेच लागते. कारण ‘जीवन जगता जगताच शिकता येते-’ हा जीवनाच्या पाठशाळेतील पहिला धडा आहे. हा धडा ज्यांनी गिरवला, अंमलात आणला, ज्यांनी त्याच्यावर चिंतन केले त्यांना जीवन म्हणजे काय हे कळले. जीवनाचा अर्थ कळला. जीवन कसे जगावे हे कळले. ज्यांनी केवळ ‘जीवन भाष्य वाचले’, व्हॉट इज लाईफ’ यावर लिहिलेले विद्वत्ताप्रचुर ग्रंथांची पारायणे केलीत आणि त्यानुसार जीवन प्रवाहात स्वतःला झोकून दिले ते वाहत गेले. ज्यांच्या जीवनाला अनुभूतीचे, चिंतनशीलतेचे अधिष्ठान आहे ते सर्व प्रतिकूल प्रवाहाशी दोन हात करीत, उलट्या प्रवाहाशी दोन हात करीत ‘उगमाकडे’ पोहोचले आहेत. यालाच संत तुकोबांनी आनंदविभोर होऊन ‘आपुलिया माहेरा जाईन मी आता’ असे म्हटले आहे. उगमाकडे पोहोचणे, माहेरी जाणे म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणे; त्यासाठी अट्टाहास करणे. तो अट्टाहास संतांनी केला. म्हणून त्यांचा ‘शेवटचा दिवस’ गोड झाला. पण हा प्रवास आपण समजतो तितका सोपा नाही.
 
 
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग
सामान्यपणे नदीच्या प्रवाहाच्या दिशेने वाहत जाण्याला काही फारसे कष्ट पडत नाहीत. सहजपणे ‘प्रवाहपतित’ होऊन जाता येते. पण प्रवाहाच्या उत्तान लहरींशी दोन हात करत उलट्या दिशेने, म्हणजे उगमाकडे पोहत जाणार्‍यांची विलक्षण दमछाक होते, ही वस्तुस्थिती आहे. पण human life जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात भव्यदिव्य उदात्त ध्येयवादाचे ‘लक्ष्य’ ज्यांनी अंगीकारले, ‘बुध्याचि हे सतीचे वाण’ ज्यांनी स्वीकारले, त्यांच्या जीवनाची ससेहोलपटच झाली की नाही? मानवी भावभावनांना दूर सारून, मुला-बाळांचे हाल उघड्या डोळ्यांनी पाहूनही निग्रहाने डोळ्यात येणारे अश्रूंचे कढ पचवून, आपल्या स्वीकृत ध्येयपथावरून हे पुढे सरकले आणि आपल्या जीवनध्येयाप्रत पोहोचण्याची एक ‘प्रकाशवाट’ यांनी निर्माण केली. त्याचाच परिणाम म्हणून मानवी जीवन पूर्णपणे काळोखात गडप होण्याचा धोका टळला. अखंडपणे तेवत राहणार्‍या नंदादीपाची भूमिका त्यांनी पार पाडली. महाराणा प्रतापांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. मोगल सैन्याला हुलकावणी देत अरवली पर्वताच्या एका गुंफेत त्यांचा सहकुटुंब मुक्काम होता. पळापळीमुळे पोटभर अन्न मिळेनासे झाले होते. छोटा उदा आणि मुलगी चंपा- दोघेही अनेक दिवसांचे उपाशी. पायथ्याशी असलेल्या भिल्लांच्या झोपडीतून जाड्याभरड्या भाकरी आणि कोरडी भाजी मुलांसाठी आणली होती. अनेक दिवसांच्या उपासामुळे भुकेलेल्या त्या पोरांनी खाण्यासाठी भाकरी हातात घेतल्या. त्याचा घास घेणार इतक्यात कोपर्‍यात दबा धरून बसलेल्या रानमांजराने उदाच्या हातावर झडप घातली अन् भाकरी पळविली. भुकेने कासाविस झालेला उदा चंपाला रडत रडत म्हणाला, ‘दीदी दीदी, पहा माझी भाकरी पळविली. आता मी काय खाऊ...’ चंपाने त्याची अवस्था पाहिली. भुकेने तीसुद्धा व्याकूळ झाली होती. करारी शब्दात ती त्याला म्हणाली- ‘अरे उदा, भाकरी पळविली म्हणून रडतोस काय? तू महाराणा प्रतापांचा पुत्र आहेस. सिंहाचा छावा आहेस. पळवून नेलेली उष्टावलेली शिकार कधी सिंह खात असतो काय...?’ उदाचे रडणे थांबले. त्याचे डोळे एका विशिष्ट तेजाने चमकले.
 
 
बाजूच्या गवाक्षातून ते काळीज हलविणारे दृश्य महाराणा प्रताप पित्याच्या ममतेने पाहत होते. त्यांच्या हृदयांत कालवाकालव झाली. त्यांचे मन आक्रंदून उठले... ‘कशासाठी आपण आपल्या पोरांना उपाशी मारतो आहोत?’ ‘देश, धर्म, संस्कृती, समाज परंपरा या गोष्टींचा ठेका काय आपणच घेतला आहे?’ ‘इतर मातब्बर लोकांचे याच्याशी काही देणे घेणे नाही?’ त्यांनी काळाशी तडजोड केली. व्यावहारिक ‘चातुर्य’ अंमलात आणले. जीवनमूल्यांशी थोडी ‘प्रतारणा’ केली आणि मुलाबाळांसमवेत ऐशआरामाचे, सुखासमाधानाचे, आयुष्य ते आज जगताहेत. त्यांची मुले हत्तीवरील अंबारीत बसून मानमरातब, लौकिक, सर्वप्रकारच्या सुखसोयी उपभोगताहेत आणि धर्मरक्षण, राष्ट्ररक्षणासाठी वनवास पत्करणारी माझी मुले, साध्या भाकरीसाठी मोताद झाली आहेत... आपले काही चुकत तर नाही आहे ना! आपल्या नुसत्या मौखिक अभिवचनाने मांडलिकत्व स्वीकार करणारा अकबर जर खूश होत असेल तर काय हरकत आहे? राजा मानसिंहानेही हाच सल्ला ‘आपलेपणातून’ दिला होता ना! हा विचार मनात आल्याबरोबर महाराणा चमकले! चितोडगड आणि शरणागती...? त्यांच्या मुलीचे शब्द तापलेल्या रसाप्रमाणे त्यांच्या कानात घुमू लागले... तू सिंहाचा छावा आहेस... महाराणांचा पुत्र आहेस... सिंह कधीही उष्टावलेली शिकार खात नाही... एकदम ते भानावर आले. त्यांना वाटले आपणही अकबराने उष्टावलेले राज्य स्वीकारायचे? सूर्यवंशाचा, तेजाचा, प्रकाशाचा मार्ग सोडून अंधाराला शरण जायचे? ते सावरले. सहजपणे त्यांचा हात कमरेला लटकलेल्या आपल्या खड्गाच्या मुठीवर गेला...आणि चितोडच्या इतिहासाने कूस पालटली.
 
 
‘कुरुक्षेत्र’ असलेल्या human life मानवी जीवनातील अंतर्बाह्य अखंडपणे चालत आलेल्या संघर्षाची अशी अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासाच्या पानोपानी आढळतात. हिंदू धर्म रक्षणासाठी आपल्या चारही पुत्रांचे बलिदान देणारे गुरुगोविंद सिंहांपासून तर आधुनिक काळापर्यंत अखंडपणे चालत आलेल्या संघर्षाच्या या महायात्रेत सहस्त्रावधी लोक देश, धर्म, संस्कृती, समाज यांच्या रक्षणासाठी सहभागी झालेत. त्यात अनेकांचा निर्वंश झाला, पण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात त्याप्रमाणे ‘निर्वंश होऊनि ठरेल अखंड वंश-’ त्याचमुळे अनादिकाळापासून चालत आलेला आपला ‘हिंदू वंश’ आजही विद्यमान आहे. ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने दमदार पावले टाकीत आहे. 
 
- 9860296131
(लेखक विचारवंत आणि माजी प्राचार्य आहेत)