आजपासून आदीशक्तीचा जागर; वर्ध्यात लखलखाट

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
शक्तीची (Adi Shakti) उपासना करण्याचे पर्व असलेल्या नवरात्रौत्सवाला उद्या सोमवार 26 रोजीपासून शुभारंभ होत आहे. त्या ऊर्जेचा संचार सुरू झाला आहे. वर्धेत चौका चौकात दुर्गा देवीची स्थापना केली जाते. त्यामुळे अख्खे शहर उजळून निघालेले असते. जिल्ह्यातील अहिरवाडा, बोपापूर, महाकाली, आंजी येथील नरसामाता येथे नवत्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. उद्या सकाळपासूनच देवी भक्तांमध्ये जोश चढणार आहे.
 
Adi Shakti
 
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्धेत नवरात्र उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. शहरातील प्रत्येक चौकातच नव्हे तर गल्लीबोळातही दुर्गा देवीची स्थापना होत असल्याने संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने गेल्या दोन दिवसांपासून नटलेले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई हे वर्धेकरांचे वैशिष्ट्य आहे. काही मंडळांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची संकल्पना साकारली आहे.
 
 
कोरोना काळातून सर्वंच प्रतिबंधात्मक निर्बंधावररून मुक्ती मिळाल्याने 3 वर्ष हरवलेला उत्साह पुन्हा परत आणण्यासाठी आईभक्त सज्ज झाले आहेत. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी 1 हजार पेक्षा जास्त ठिकाणी दुर्गा देवीची स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळातर्फे भव्य पेंडाल तयार करून विविध झाक्या साकारल्या जातात. 9 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. लंगरचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येते. यावर्षी गरबा, जगतारा, लंगर आदी कार्यक्रमाचे भव्य आयोजन होणार आहे. ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्याच्या विविध गावातही मोठ्या प्रमाणात दुर्गा देवीची स्थापना केली जाते.
 
 
नवरोत्सव दरम्यान एक गाव एक देवीचे (Adi Shakti) आवाहन केल्यानुसार 310 ठिकाणी एक गाव एक दुर्गादेवीची स्थापना करण्यात येणार आहे. उद्या सोमवारी सायंकाळपर्यंत दुर्गा देवीची ठिकठिकाणी स्थापना करण्यात येणार असल्याने मूर्तिकार शेवटचा हात मारत आहेत. यावर्षी पावसामुळे मुर्ती तयार करण्यात अडचणी आल्या होत्या. दुर्गादेवीची स्थापना होण्यापूर्वी तिचा साजही करण्याची नवीन परंपरा तयार झाल्याने रात्रीपासूनच मूर्तीला साडीसह सजवण्याच्या कामाला लागले आहेत. राज्यात तयार झालेली जातीय तेढ लक्षात घेेता जिल्ह्यात 1700 पोलिस कर्मचारी तर 200 पोलिस अधिकार्‍यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून त्यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे जवानही देण्यात आले आहेत. रक्तदान, नेत्रदान शिबिर, कोरोना व्हॅक्सिन कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री दुर्गा पुजा उत्सव समिती सराफा लाईनचे दिलीप कठाणे यांनी सांगितले.