अमेरिका संपन्न पण असुरक्षित : अनिल जयस्वाल

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
वणी, 
आर्थिक महासत्ता म्हणून जगात मान्यता प्राप्त असलेल्या अमेरिकेत (America) भौतिक सुविधा मनाला प्रसन्न करणारी असली तरी शस्त्रविक्रीवर अर्थव्यवस्था आधारित असण्याने आणि समाजाच्या मुक्त व्यवस्थेमुळे सुरक्षितता अमेरिकेची सगळ्यात मोठी काळजी आहे. असे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रसिद्ध व्यावसायिक अनिल जयस्वाल यांनी व्यक्त केले.
 
America
 
विदर्भ साहित्य संघ आणि नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येत असलेल्या माझं गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमात माझी अमेरिका वारी या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे व नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार उपस्थित होते. प्रस्तावना माधव सरपटवार यांनी तर वक्त्यांचा परिचय करून देताना गजानन कासावार यांनी करून दिला. अमेरिका (America) म्हटल्याबरोबर आपल्या मनात येणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या आठवणीपासून विवेचनाला सुरवात करीत अनिल जयस्वाल यांनी अमेरिकेच्या विविध शहरांचा उल्लेख करीत नायगरा धबधबा, एम्पायर स्टेट, नासा म्युझियम, काँग्रेस लायब्ररी, मियामी बीच, अ‍ॅडवेंचर पार्क, मिशिगन लेक आर्किटेक्चर स्क्रूज इ. इत्यादी सौंदर्य स्थळांचे वैशिष्ट्य स्पष्ट केले.
 
 
अठरा वर्षानंतर घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांची प्रवृत्ती, कायद्याचे काटेकोर पालन, पडेल ते काम न लाजता करण्याची वृत्ती, परस्परांना आदर देण्याची प्रवृत्ती, तत्काळ मिळणारी अत्याधुनिक शासकीय सुविधा अशा अनेक सकारात्मक गोष्टींना आपण अंगिकारणे आवश्यक आहे, असे विशेषत्वाने आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. दिलीप अलोणे यांनी अमेरिका आणि भारताच्या संपत्ती की संस्कृती या मूलभूत प्रवृत्तीचे विवेचन करीत आयोजकांच्या प्रयत्नांनी नवनवीन वक्ते तयार होत असल्याचे समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमासाठी देवेंद्र भाजीपाले, राम मेंगावार, प्रमोद लोणारे यांनी विशेष परिश्रम घेतले.