प्रामाणिक शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत

- सण, उत्सवाच्या काळात शेतकरी आर्थिक कोंडीत

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पीककर्ज (Crop Loan) घेतले. अस्मानी व सुलतानी संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्याने हजारो शेतकर्‍यांनी पीककर्जाची परतफेड केली नाही. त्यांना पीककर्ज माफीचा लाभ मिळाला. मात्र, नियमित पीककर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. अशा शेतकर्‍यांना सरकारने 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. परंतु अजूनपावतो शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अनुदान राशी जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठा रोष आहे.
 
Crop Loan
 
राज्य शासनाने सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून 3 लाखाचे पीककर्ज (Crop Loan) बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीप हंगामाच्या तोंडावर पीककर्ज घेतले आणि याच पीककर्जातून त्यांनी बियाणे, खत व शेतीउपयोगी साहित्य खरेदी केले आहे. पण, मागील काही वर्षांपासून शेतकर्‍यांवर अस्मानी व सुलतानी संकट ओढवल्याने त्यांनी पीककर्जाचा भरणा केलेला नाही. या आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकर्‍यांना पीककर्ज माफीचा लाभ देण्यात आला आहे. पण नियमित पीककर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना कोणताही लाभ दिलेला नाही.
 
  
नियमित पीककर्ज (Crop Loan) फेडणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षांपासून शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकर्‍यांनी रक्ताचे पाणी हाडाची काठी करून वेळप्रसंगी विपरीत परिस्थितीत आपल्या सौभाग्यवतींचे दागिने गहाण ठेवून कर्जाची परतफेड केली. खरंतर अशा या प्रामाणिक शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान देऊन सन्मान करणे गरजेचे होते. परंतु ते महाविकास आघाडी सरकारला जमले नाही. आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाले आहे. यांच्याकडूनही मोठी अपेक्षा होती. परंतु शेतकर्‍यांचा भ्रमनिरास होताना दिसत आहे. नवरात्र, दिवाळी तोंडावर आहे. सततचा पाऊस यामुळे पिकांना फटका बसला आहे, हातात आलेला घास वरून राजा हिरावून घेतो की काय? अशी भीती शेतकर्‍यांत आहे.
 
 
गोंदिया जिल्ह्यातील सुमारे 30 हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. नियमित पीककर्ज भरून आम्ही चूक केली काय? असा प्रश्न शेतकरी करीत आहे. शेतकर्‍यांवर अस्मानी, सुलतानी व आर्थिक संकट असतानासुद्धा त्यांनी पीककर्ज नियमित भरले आहे. पशूधन व दागदागिने विकून सरकारला सहकार्य केले आहे. सध्या शेतकरी अतिवृष्टी व पुरामुळे हवालदिल झाला आहे. उभे पिके जमीनदोस्त होत आहे. त्यातच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. अशा संकटाच्या काळात सरकारने नियमित पीककर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करावे, अशी माफक मागणी आहे.