सतत पावसामुळे खरिपातील पिके धोक्यात

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
मारेगाव, 
यावर्षी सतत सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाचे (Crops in Kharip) वाटोळे होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रोजच्या पावसाने कपाशीचे बोंड सडण्याची वेळ आली आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्या, पण त्यातील दाण्यात कणखरपणा दिसून येत नाही. कापणी कशी व कधी करता येईल या विवंचनेत बळीराजा चिंताग्रस्त झाले आहेत.
 
Crops in Kharip
 
दरवर्षी साधारणपणे पोळ्यानंतर पाऊस खंडित होतो. सोयाबीनची मशागत संपल्यात जमा असते. कपाशीचे डवरणे बंद केल्या जाते. केवळ फवारणीवर जोर दिल्या जातो. पण, यंदा तणपोषक पावसाने शेतकर्‍यांचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. आजही महिला मजुरांकडून निंदण करण्याची व्यवस्था करण्यात शेतकरी व्यस्त आहे.
 
 
या अखंड पर्जन्यवृष्टीने शेतामधील उभ्या कपाशीची बोंडे काळी पडण्यास सुरुवात झाली आहे. पिवळे पडणारे सोयाबीन, त्यातच खोडकीडीचा प्रादुर्भाव यामुळे हे पीक कसेबसे कापून मळणी कशी व कधी करणे जमेल की पावसाने पिच्छा पुरवला तर सोयाबीनची गंजी तशीच ठेवावी लागेल या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता सप्टेंबर संपत चालला आहे. तरी पावसाचे कमी व्हायचे नाव नाही. तीन वेळा पेरण्या करून शेतकरी हवालदिल झाला होता. त्यात भर घातली ती अखंड पावसाने. सलग पावसाने बेजार झालेल्या शेतकर्‍यांनी हिंमत न हरता वेळोवेळी निंदण, डवरणे व कीटकनाशकांची फवारणी करून आशा निर्माण केल्या.
 
 
यावर्षी खरीप हंगामात 103 टक्के पाऊस पडेल, असे हवामान खात्याने व्यक्त केले होते. त्यामुळे भरपूर प्रमाणात उत्पन्न अपेक्षित होते, परंतु हंगामाची सुरवात अपेक्षाभंगाने झाली. मृग कोरडे गेले. जुलैच्या शेवटी पडायला लागलेल्या पावसाने शेतकर्‍यांना पुरते जर्जर केले. आता सोयाबीन कापणीला आलेले आहे. कपाशी बोंडे फुटण्याच्या मार्गावर आहे. आता पाऊस थांबला नाही तर शेतकरी जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही. देशाचा पोशिंदाच भूकमरीने मरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.