अन् अधिकारी-कर्मचार्‍यांची झाली धावपळ

- शेतकर्‍याची जलवाहिनी फुटली

    दिनांक :25-Sep-2022
|
अकोला, 
शहराला पाणीपुरवठा करणारी 600 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (Water Pipe) फुटल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळाल्यानंतर अधिकार्‍यांची एकच धावपळ झाली. या वाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णयही घेतला. मात्र, फुटलेली जलवाहिनी ही शहराला पाणीपुरवठा करणारी नसून ही जलवाहिनी बार्शिटाकळी शहरालगत असलेल्या कान्हेरी सरप येथील एका शेतकर्‍याची होती. ही बाब उघड झाल्यानंतर अधिकारी चक्रावले अन् त्यांना चांगलीच धावपळ करावी लागली.

Water Pipe
 
सद्यस्थितीत पाणीपुरवठा विभागाने 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील (Water Pipe) गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. पाच ते सहा ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीची कामे आहेत. या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागाने बार्शिटाकळी शहरालगत मुख्य जलवाहिनीवर असलेल्या अवैध नळजोडण्या तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठीच अकोल्यावरुन निघालेल्या कंत्राटदारांस कान्हेरी सरपजवळ जलवाहिनी फुटलेली आढळून आली.
 
संबंधित कंत्राटदाराने पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी जलवाहिनी फुटल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांना दिली. अधिकार्‍यांनी धावपळ करीत कान्हेरी सरप गाठले. यादरम्यान सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्ष जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी गेल्यानंतर ही फुटलेली जलवाहिनी महापालिकेची नसून ही एका शेतकर्‍याची असल्याची बाब समोर आली. फुटलेली जलवाहिनी शहराला पाणीपुरवठा करणारी नसून शेतकर्‍याची आहे, ही बाब निश्चित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी सुटकेचा श्वास सोडला.