दुभाजकामधील झाडे कापल्याने 20 लाखांचे नुकसान

- सा. बां. विभागाचे यवतमाळ नगर परिषदेला पत्र

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावरील दुभाजकामध्ये (डिव्हायडर) लावण्यात आलेली फुलांची झाडे नगर परिषदेने परस्पर कापून टाकल्यामुळे (Felling of trees) शासनाचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात तातडीने अहवाल सादर करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 सप्टेंबर रोजी यवतमाळ नप मुख्याधिकार्‍यांना दिले आहे.
  
Felling of trees
 
या पत्रात शहरातील नागपूर-तुळजापूर मार्गावरील एसटी बसस्थानक ते वनवासी मारुती मंदिरपर्यंत मार्गावरील दुभाजकामध्ये सा. बां. विभागाने केंद्रीय मार्ग निधी योजनेत फुलांची झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे काम 2019 मध्ये केले होते. ही झाडे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी होती. दरवर्षी या झाडांची निगा राखण्याचे काम सा. बां. विभागाकडून करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी यवतमाळ नपने कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा कुठलीही परवानगी न घेता परस्पर ही झाडे पूर्णत: तोडून (Felling of trees) टाकली.
 
 
याबाबत नगर अभियंत्यांना विचारणा केली असता, ‘मला काहीही माहीत नाही, प्रशासक मॅडमना विचारा’ असे त्यांनी सांगितले. ही झाडे कापल्यामुळे शासनाचे अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा सा. बां. विभागाने केला आहे. याच मार्गावर दुभाजकाच्या बाजूला लावण्यात आलेले लोखंडी रेलिंगही कुठलीही परवानगी न घेता नप मुख्याधिकार्‍यांच्या आदेशावरून कापण्यात आले आहे. बांधकाम विभागाने ते काम थांबवून कापलेले रेलिंग पुन्हा लावून देण्याचे निर्देश नपला काही महिन्यांपूर्वी दिले होते. पण ते कामही झाले नसल्याने त्याही संदर्भात नपला स्मरणपत्र देण्यात आले आहे.


बोगनवेलींनी ओरबाडले
या दुभाजकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध रंगांच्या बोगनवेली लावल्या होत्या. यंदा भरपूर पाणी मिळाल्यामुळे त्या जोरदार वाढल्या होत्या. त्या बाजूच्या लोखंडी रेलिंगच्या बाहेर डोकावायला लागल्या होत्या. भरपूर आणि मोठमोठ्या काट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या बोगनवेली दुचाक्यांवरून जाणार्‍या नागरिकांना ओरबाडायला लागल्या होत्या. अनेकजण या काट्यांमुळे रक्तबंबाळ झाल्याच्याही घटना घडल्या होत्या. या बोगनवेलींनी आपली ‘मर्यादा’ ओलांडू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सा. बां. विभागाने पार पाडली नाही, म्हणून आम्ही हे काम केल्याची माहिती नप सूत्रांनी दिली. बोगनवेल हा काट्याचा प्रकार शहरातील रस्ता दुभाजकांमध्ये लावणे हा मूर्खपणाच आहे, असेही मत एका स्थापत्य अभियंत्याने व्यक्त केले.


मावळत्या ‘मॅडम’ अडचणीत
जुन्या मुख्याधिकारी ‘मॅडम’च्या कार्यकाळात झालेल्या या कामासंदर्भात आता नवे मुख्याधिकारी काय अहवाल देणार आणि त्यानंतर बांधकात विभाग पुढे काय करणार, याकडे आता यवतमाळकरांचे लक्ष लागले आहे. सुमारे 20-22 लाख रुपये खर्चून नपने केलेले सायकल ट्रॅकचे कामही जिल्हाधिकार्‍यांनी नियमबाह्य ठरविल्यामुळे काढून टाकण्यात आले आहे. त्याचीही जबाबदारी माजी मुख्याधिकारी व प्रशासक ‘मॅडम’वर टाकण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून पुढे आली आहे.