गोदावरी अर्बनला 22.50 कोटींचा शुद्ध नफा

- वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
- ग्राहकांना 7 टक्के लाभांश मिळणार

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
नांदेड, 
सहकार क्षेत्रात योग्य नियोजन केल्यास त्या संस्थेचा विकास होण्यास वेळ लागत नाही. नऊ वर्षार्ंपूर्वी हेमंत आणि राजश्री पाटील या दाम्पत्याने गोदावरी अर्बनचे (Godavari Urban) लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतरीत झाले आहे. गोदावरीने केवळ पाच राज्यांतच नव्हेतर पंचवीस राज्यात आपला झेंडा फडकवावा, अशी भावना माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंत चव्हाण यांनी व्यक्त केली.
  
Godavari Urban
 
येथील गोदावरी अर्बन (Godavari Urban) मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, 25 सप्टेंबरला नांदेड येथे उत्साही वातावरणात झाली. यावेळी उद्घाटक म्हणून वसंत चव्हाण बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांची उपस्थिती होती. या वेळी गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील, गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील, उपाध्यक्ष हेमलता देसले, लेखापरीक्षक जीवन लाभसेटवार, सचिव अ‍ॅड. रवींद्र रगटे, संचालक प्रा. सुरेश कटकमवार, वर्षा देशमुख, यशवंत सावंत, साहेबराव मामिलवाड, प्रसाद महल्ले, अजय सरसमकर, मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले, ज्या राज्यात शैक्षणिक व वित्तीय संस्था बळकट असतात त्या राज्याचा विकास अधिक गतीने होतो. गोदावरीने सहकार क्षेत्रातील सर्व निकषांची पूर्तता करीत सर्वांगीण प्रगती साधली आहे. संस्थेच्या वार्षिक अहवालात नियोजित कार्यापेक्षा 30 टक्क्यांपेक्षा अधिकचे उद्दिष्ट साध्य केले ही गौरवास्पद बाब आहे. यावेळी खा. हेमंत पाटील यांनी, संस्था अधिक कार्यक्षमतेने पुढे घेऊन जाण्यासाठी कर्मचार्‍यांना हायटेक प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना गोदावरीच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी संस्था वेगाने कार्य करेल, असे सांगितले.
 
 
अध्यक्ष राजश्री पाटील म्हणाल्या, दरवर्षी सर्वसाधारण सभा होते. परंतु त्यातून ग्राहकांना वर्षभरात काय सुविधा मिळाल्या, हे अधिक महत्वाचे असते. गोदावरी अर्बन नेहमीच ग्राहकांच्या हिताचा विचार करत आली असून यावर्षी 7 टक्के इतक्या भरघोस लाभांशाची घोषणा केली आहे. यावेली प्रास्ताविकातून व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी संस्थेच्या वार्षिक वाटचालीचा आढावा घेऊन वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यानंतर उत्कृष्ट ठेवीदार, कर्जदार, गुणवंत विद्यार्थी यासोबतच सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शाखेचा सन्मान करण्यात आला. समस्त दैनिक, आवर्त ठेव प्रतिनिधी आणि कर्मचारी यांनादेखील बक्षिस देऊन त्यांचा सत्कार केला.

पुरस्कारांचे मानकरी
यावेळी मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे यांना एक्सलन्स अवॉर्ड, यवतमाळच्या मुख्य शाखेचे रवी इंगळे यांना ट्रिपल सेंच्युरी अवॉर्ड, प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवाम्म यांना एक्सलन्स अवॉर्ड, पुसद शाखा भारत राठोड यांना सेंच्युरी अवॉर्ड, अमित पिंपळकर यांना विक्रमादित्य अवॉर्ड, बेस्ट असेट ब्रँच अवॉर्ड दिग्रसच्या राहुल कोल्हे आणि चिखलीच्या दीपक अवसरमोल यांना देण्यात आले.