शिंदे फडवणीस सरकार अस्थिर : नाना पटोले

- काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांचे सरकार अस्थिर (Government unstable) आहे. सरकारमध्ये प्रचंड मतभेद असल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही. सरकार स्थापनेनंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसून एकाच मंत्र्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. त्यातून या सरकारची अवस्था स्पष्ट होते, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
 
Government unstable
 
काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या भारत दौर्‍यावर असून ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात पोहोचणार आहे. पदयात्रेच्या पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी अमरावती येथे कार्यकर्ता बैठक घेतली. यावेळी मंचावर माजी मंत्री यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, आ. बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, विलास इंगोले यांच्यासह अन्य नेते हजर होते. पुढे पटोले म्हणाले, राज्यभरात पन्नास लाख कार्यकर्त्यांची फौज तयार केली जाणार आहे. कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचे लॉबिंग करू नये. तिकिटासाठी वाद घालू नये. आपल्या वार्डात काम करावे.
 
 
काँग्रेस आता सामान्य माणसाला नेतृत्वाची संधी देणार आहे. जो काम करेल त्याला तिकीट दिल्या जाईल असे ते म्हणाले. लोकांच्या मनात अद्यापही काँग्रेस आहे. यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेसमुळे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना मस्जिद मध्ये जावे लागले. यावरून भारत जोडो पदयात्रा यशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. भाजपची आयटी सेल, गोदी मीडिया यामुळे काँग्रेसबद्दल जनमानसात वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे. याला उत्तर देण्यासाठी काँग्रेस देखील आता सक्षम होत आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहन नाना पटोले यांनी यावेळी केले.
 
 
अमरावती शहर व लोकसभा काँग्रेस लढविणार
गत निवडणुकीत काँग्रेसने अमरावती शहर विधानसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार दिला नव्हता. ही मोठी चूक होती. याशिवाय लोकसभा निवडणुकीत देखील चुकीच्या उमेदवाराला सहकार्य केले होते. मात्र, यापुढे काँग्रेस उमेदवारीचे दान करणार नाही. या दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार असणार असे नाना पटोले यांनी सांगितले.