सिंचन विभागाच्या पाण्याने रोखली शेतकर्‍यांची वाट..!

- आर्णी तालुक्यात बंधारे बांधकामात शेतकरी त्रस्त
- जवळा शेतकर्‍यांनी केली रस्त्याची मागणी

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
आर्णी,  
शासनाच्या जलसिंचन विभागाच्या (Irrigation department) ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेतून तालुक्यातील जवळा येथील जांब नाल्यावर सिमेंट बंधारा बांधला आहे. मात्र ऐन शेतात जाण्याच्या रस्त्यावर हा बंधारा बांधल्याने आता पावसाळ्यात त्यामध्ये वाहते पाणी अडले असल्याने शेतात जाण्याचा रस्ता अडला आहे. त्यामुळे जवळा येथील शेतकर्‍यांनी आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता द्या, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
Irrigation department
 
जवळा जांब शिवारातील नाल्यावर पाणी अडविण्यासाठी पांडुरंग मुजमुले यांच्या सर्वे नं. 460 यांच्या शेतालगत सिंचन विभागाने सिमेंट बंधार्‍याचे बांधकाम गेल्या उन्हाळ्यात केले आहे. आता पावसाळ्यात त्यामध्ये पाणी अडले आहे. मोठ्या प्रमाणावर म्हणजे शेतात जाण्याच्या वाटेवर जवळपास तीन फूट पाणी आले आहे. सध्या शेतात जाताना कंबरभर पाण्यातून नाला ओलांडून जाताना मोठी कसरत करावी लागते अशी परिस्थिती आहे.
 
 
पावसाळ्यात कशीबशी शेतात येजा केली. आता शेतमाल काढणीचे दिवस तोंडावर आले आहेत. अशातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी संजय पंचभाई, दादाराव गभणे. सुहास पंचभाई, कायमखां पठाण, रोशन पंचभाई, प्रियंका पंचभाई, बाबाराव गावंडे, आलम पठाण, उषा पंचभाई, कांता अनंत पंचभाई, स्मिता संतोष राजनकर, अनसूया वसंत देशमुख यांनी आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता द्यावा अशी मागणी केली आहे.

ऐंशी एकरातील शेतीची गोची
सिंचन विभागाच्या (Irrigation department) सिमेंट बंधार्‍याचे बांधकाम शेतात जाण्याच्या रस्त्याजवळ झाले. त्यामुळे रस्त्यावर पाणी अडले आहे. त्यामुळे जवळपास पंधरा सोळा शेतकर्‍यांना शेतात येजा करणे कठीण झाले आहे. सत्तर ते ऐंशी एकरातील शेतमाल घरी आणण्याची चिंता आम्हा शेतकर्‍यांना लागली आहे. शेतात जाणे मुश्कील झाले आहे त्यामुळे आम्ही सर्व त्रस्त आहोत, असे शेतकरी सुहास पंचभाई म्हणाले.