मानेकरांच्या तिसर्‍या पिढीची मूर्तीकला साधना..!

- वडगावची देवी यावर्षीचे मुख्य आकर्षण

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
वारसा (Idol art) हा गुणांचा, कर्तृत्वाचा, कलेचा असतो तेव्हा तो पिढी दर पिढी निखरत असतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मूर्तीकार गौरव मानेकर. गौरव हा मानेकर कुटुंबातील तिसर्‍या पिढीचा शिलेदार असून त्याने घडविलेली वडगाव येथील सुभाष दुर्गोत्सव मंडळाची मूर्ती यावर्षीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
 
Idol art
 
64 कलांपैकी एक महत्वाची कला म्हणजे मूर्तीकला (Idol art). मूर्तीकार जसा जसा या कलेत पारंगत होतो, निष्णात होतो, तसतशी मूर्ती जिवंत भासू लागते. दुर्गोत्सवासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ शहरात मूर्तीकलेचा जेव्हा-जेव्हा विषय येतो तेव्हा मानेकर नावाशिवाय ही चर्चा पूर्ण होत नाही.
 
 
मानेकर परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून मूर्तीकला जोपासत आहे. रघुनाथ बाबूजी मानेकर यांनी या क्षेत्रात छाप उमटविली. गणपती, महालक्ष्मी, दुर्गामूर्ती घडविताना त्यात प्राण ओतण्याचे कसब रघुनाथ यांचे चिरंजीव सुभाष मानेकर यांनी आत्मसात केले आणि आता सुभाष यांचे चिरंजीव गौरव मानेकर ही साधना करीत आहेत. गौरव यांच्यादेखील हातात जादू आहे. त्यांनी साकारलेल्या मूर्त्यांना प्रचंड मागणी आहे. जिल्हाभरात अनेक मंडळे त्यांच्याकडून मूर्ती घेऊन जातात, यंदा त्यांनी वडगाव येथील प्रसिद्ध सुभाष दुर्गोत्सव मंडळाची मूर्ती साकारली आहे, जी यंदा यवतमाळ शहराचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.