हत्तीच्या कळपाने केले अनेक शेतकर्‍यांचे नुकसान

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अर्जुनी मोर, 
गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेला 23 हत्तींचा (Elephants) कळप 23 सप्टेंबर रोजी गाढवी नदीच्या काठावरील खोडदा गावात होता. 24 सप्टेंबरच्या रात्री महागाव, येगाव शेतशिवारात या हत्तीच्या कळपाने प्रवेश करून काही शेतकर्‍यांच्या धान पिकाचे नुकसान केले. दरम्यान, खामकुरा व येगाव येथील शेतकर्‍यांनी रात्रीच्या वेळी गस्त केल्याने हत्तीचा कळपाने पुन्हा खोडदाकडे प्रस्थान केल्याची माहिती आहे.
 
Elephants
 
हत्तींच्या (Elephants) या आगमनाने अर्जुनी मोर तालुक्यात दहशतीचे वातावरण असून वन विभागाने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. दोन दिवसाआधी अरुणनगर येथील विनय मंडळ या इसमाचा वाघाने फडशा पडला. त्यातच तोंडाशी आलेला धान पीक हत्तीचा कळप उध्वस्त करत असल्याने शेतकर्‍यांसमोर मोठा प्रश्न उभा झालेला आहे. संदर्भात अर्जुनी मोर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी खोब्रागडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता हत्तीच्या कळपामुळे ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे, त्यांना वन विभागकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
 
 
केशोरी वनपरिक्षेत्रात ‘सिटी वन’ हा नरभक्षी वाघ दाखल झाला आहे. तर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून हत्तीचा कळप सुद्धा या परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकर्‍यांना सतर्क राहण्याचे सूचना केल्या असून जंगल परिसरात गुरे चराई लाकडे आणण्यासाठी व इतर कामासाठी झाल्यास मनाई केली असल्याचे केशोरीचे वनक्षेत्र सहाय्यक सी. व्ही. नान्हे यांनी सांगितले.