‘ती’ बेपत्ता चार मुले ओडिशात सापडली

    दिनांक :25-Sep-2022
|
वर्धा, 
गेल्या काही दिवसांपासून मुलं पळवणारी टोळी (Missing Children) सक्रिय झाल्याचे व्हीडिओ समाजमाध्यमांवर धूम करीत असल्याने समान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असतानाच शनिवार 24 रोजी रात्रीपासून सेलू तालुक्यातील मसाळा येथील चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची माहिती वार्‍यासारखी जिल्ह्यात पसरल्याने मुलं चोरणार्‍या टोळीच्या व्हीडिओला पाठबळ मिळाले. मात्र, दुपारनंतर चारही बेपत्ता मुलं रेल्वेस्थानकांवरील सीसीटीव्हीत कैद झाली असून ते एकटेच असल्याचे दिसत असल्याने या मुलांना पळवले नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चारही मुलं ओडिशातील बरसिंगा रेल्वेस्थानकावर सापडल्याचे पोलिस विभागातर्फे कळवण्यात आले आहे.
  
Missing Children
 
सेलू तालुक्यातील मसाळा येथील पप्पू देवढे याला शनिवार 24 रोजी त्याच्या वडिलांनी सकाळी 11 वाजता शाळेतून घरी सोडले आणि ते शेतात गेले. सायंकाळी घरी आले असता त्यांना मुलगा दिसला नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता गावातील पप्पूचे आणखी राज येदानी (13), राजेंद्र येदानी (12), संदीप भुरानी (8) हे तीन मित्र बेपत्ता (Missing Children) असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पप्पूच्या वडिलांनी सेलू पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीपासून मुलांच्या शोधात पोलिस असताना चार अल्पवयीन मुले वर्धा रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत कैद झाली. एवढेच नव्हे, तर ही मुले नागपूरच्या दिशेने जाणार्‍या रेल्वेत चढल्याचेही दिसत आहे. मुलांचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्याने पोलिसांनी आता त्यादिशेने तपास सुरू केला आहे.
 
 
बेपत्ता असलेल्या मुलांमुळे अनेक तर्कवितर्क काढले जात असताना फुटेजमुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. चार मुले स्वतःच्या मर्जीने वर्धा रेल्वेस्थानकावर फिरतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी रेल्वेस्थानकावरून गांधीधाम गुजरात ते पुरी ओडिशा या रेल्वेने निघून गेल्याचा व्यक्त केलेला संशय खरा ठरला. ही मुलं ओडिशा राज्यातील बांदिवार रेल्वेस्थानकावर आढळून आली असून रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.

भंगार विकून केला उपद्रव
गावातील ही चारही मुलं गावानजीकच्या कारखान्यातील भंगार जमा करायचे. ते ऑटोने वर्धेला नेऊन विकत होते. भंगार विकत असल्याने पोलिसांत तक्रार देतो, असे गावातील तरुणांनी सांगितल्याने चारही मुलं गावातून पळून गेल्याचे आमच्या आकोली येथील प्रतिनिधीने कळवले.