रिसोडचे आराध्य दैवत पिंगलाक्षी देवी

    दिनांक :25-Sep-2022
|
जयंत वसमतकर
रिसोड, 
रिसोडचे आराध्य दैवत, शहराची पालन करता श्री पिंगलाक्षी देवीच्या नवरात्र उत्सवास उद्या, २६ सप्टेंबर रोजी प्रारंभ होत आहे. या ठिकाणी थोर मुनी, महात्मे, ऋषी यांनी तपश्चर्या केली आहे, ते ठिकाण म्हणजे पिंगलाक्षी देवीचे शिवकालीन मंदिर.
शहराच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी मंदिरात माता पिंगलाक्षी देवी विराजमान आहे.
 
gh
 
 
 
 
पूर्वी काळी या ठिकाणी घनदाट जंगल असल्याने ऋषी मुनींना तपश्चर्या करण्यासाठी या जागेची ओढ असे. या ठिकाणी पौराणिक कथेनुसार अगस्ती ऋषी व त्यांच्या पत्नी तसेच अनेक ऋषींनी निसर्गसौंदर्याला पाहून तपश्चर्या केली. पिंगलाक्षी देवी मंदिर परिसरात श्रीराम सीता यांचा सहवास होता, असा पौराणिक कथेमध्ये उल्लेख आहे. संत सखाराम महाराज यांनीही याठिकाणी अनेक वर्ष तपसाधना केली. शहराच्या दक्षिण दिशेला तीन किमी अंतरावर पिंगलाक्षी देवीचे मंदिर आहे. नवरात्र उत्सवामध्ये भाविकांसाठी भक्ती, आनंद यांचा हा उत्सवच असतो. सकाळी तीन वाजतापासून शहरातील भक्त पाई चालत पिंगलाक्षीचे देवीचे दर्शन घेतात. सकाळी पाच वाजता होणार्‍या आरतीला नवरात्र उत्सवामध्ये भक्तांची गर्दी असते. या मंदिराजवळ मोठे पुरातन वृक्ष असून, मंदिराच्या जवळच विस्तीर्ण तलाव आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडली आहे. यावर्षी नव्यानेच मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. नवरात्र उत्सवामध्ये सर्व परिसरातील भाविक वनभोजनाचा आस्वाद घेतात. विविध प्रकारची खेळण्याच्या वस्तूंची दुकाने, प्रसादाची दुकाने, आकाश पाळणे, चक्री यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येते. रिसोडचे संत अमरदास बाबा यांना पिंगलाक्षी देवी ने मातेचे रूप घेऊन संगोपन केल्याची आख्यायिका आहे. या परिसरात पिंगलाक्षी देवीचे मंदिर, पुरातन वृक्ष, विस्तीर्ण तलाव यामुळे या ठिकाणी शासनाने मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरण करून विश्राम गृह निर्माण करावे, त्यामुळे पिंगलाक्षी देवी परिसराचा विकास होईल. हिंगोली रस्त्या पासून पिंगलाक्षी देवी मंदिरापर्यंत दुभाजक रस्ता व लाईट व्यवस्था होणे गरजेचे आहे.
छायाचित्र - आई श्री पिंगलाक्षी देवी