नाना पटोले फडणवीसांच्या नखाची बरोबरी करू शकत नाहीत

- भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची पत्रकार परिषद

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
Press Conference : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्धेसह विदर्भातील सहा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस स्पायडर मॅन आहेत का असा टोला लगावला असता भाजपाचे प्रदेशाध्ययक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले फडणवीसांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत. फडणवीसांना राज्यातील प्रत्येक गावांचा अभ्यास आहे. पटोलेंना अभ्यास करावा लागेल. पटोलेंची ती उंची नाही, असा घणघात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर केला.
 
Press Conference
 
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनुकळे आज 25 रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conference) ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, प्रदेश सचिव राजेश बकाने, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
 
बावनकुळे पुढे म्हणाले, नाना पटोले यांच्या जिल्ह्यात ते धानाचा बोनस, शेतकर्‍यांना वीज देऊ शकले नाही. ते केवळ जिल्ह्याचे नेते राहिले आहे. भंडारामध्ये कोंबून 6 बालकांचा मृत्यू झाला होता. ही घटना नाना पटोले यांनी विसरू नये असेही ते म्हणाले. अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी योग्य नाही असेही ते म्हणाले. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त टोमणे सभा झाल्या. आता शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले आहे. दोन्ही नेते समाजासाठी सर्मपित कार्यकर्ते असून त्याची विकासाची बुलेट ट्रेन आहे. केंद्र व राज्य सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील असे ते म्हणाले.
 
 
उपमुख्यमंत्री फडणवीस हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. ते विकासामध्ये लक्ष टाकतील. मात्र संघटनात्मक बाबीवर जातीने लक्ष घालून आगामी नगर पालिकांसह जिल्हा परिषद व सर्वच निवडणुका एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपा युतीमध्ये लढून विजय मिळवू. भाजपात येत्या काळात वर्धापासून कोल्हापूरपर्यंत व गडचिरोलीपासून गड हिंगल्जपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश करतील, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता संपर्कात आहे का असा प्रश्‍न विचारला असता दररोज नवीन बातमी येईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
सत्ता गेल्याने ते बावचळले आहेत. स्वत: मुख्यमंत्री, मुलगा मंत्री अशी स्थिती होती. म्हणून त्याच्यापासून कार्यकर्ते दूर झाल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील प्रत्येक बुथवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे 25-25 कार्यकर्ते भाजपात प्रवेश करतील, असे नियोजन असल्याचे ते म्हणाले. गेल्या 5 वर्षात राज्यातील रेंगाळलेली कामं येत्या अडीच वर्षात पुर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. आघाडी सरकारमधील नेत्यांनी खोटारडे पणा बंद करावा अन्यथा भाजपा जशास तसे उत्तर देईल, असेही ते म्हणाले.