पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ला भरगच्च उपस्थिती

- स्वच्छता कर्मचारी व फेरीवाल्यांचा सत्कार
- खा. बोंडेंच्या सूचनेवरून मनपाचे आयोजन

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 93 व्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अमरावती महानगरपालिकेने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित केले होते. यावेळी प्रचंड प्रमाणात उपस्थिती दिसून आली. या ‘मन की बात’ च्या प्रक्षेपणानंतर स्वच्छता कर्मचारी, फेरीवाले यांचा सत्कार करून त्यांना ओळखपत्रे देण्याचा कार्यक्रम पार पडला. स्वच्छता कर्मी, फेरीवाले यांच्यासह महानगरपालिकेतील सर्व कर्मचार्‍यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सबका प्रयास सबका कर्तव्य’ असे सांगितल्याप्रमाणे अमरावती शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित निर्माण होईल, असा विश्वास खा. डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी खा. नवनीत राणा, आ. प्रवीण पोटे, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर उपस्थित होते.
 
Mann Ki Baat
 
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमाचे आयोजन खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या सूचनेनुसार अमरावती महानगरपालिकेने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहामध्ये केले होते. या कार्यक्रमामध्ये शहरातील मान्यवर व्यक्तींसोबत शहरातील स्वच्छता कर्मचारी, फेरीवाले यांना निमंत्रित केले होते. या सर्व कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरदर्शनच्या माधमातून होणार असल्यामुळे मोठी उत्सुकता अमरावती शहरामध्ये निर्माण झाली होती. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ मध्ये चित्त्यापासून ते दिव्यांगापर्यंत सर्व अंगांना स्पर्श केला आणि सर्वश्रेष्ठ भारत निर्माण करण्याकरिता सर्व भारतातील लोकांचा सहभाग आवश्यक असतो, हे सुद्धा या कार्यक्रमातून प्रतीत करण्यात आले.
 
 
या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) च्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून अमरावती शहरातील स्वच्छता कर्मचारी व फेरीवाले यांना प्रेरित करावे हा उद्देश या ‘मन की बात’ च्या कार्यक्रमाच्या आयोजना मागे होता. ‘मन की बात’ चा कार्यक्रम झाल्यानंतर पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला. आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरीवाल्यांसाठी केलेल्या पी. एम. स्वनिधी अंतर्गत फेरीवाल्यांना 10 हजार व 20 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचे सांगितले. या कार्यक्रमात भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर, माजी महापौर चेतन गावंडे, माजी पक्षनेता तुषार भारतीय, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, उपायुक्त डॉ. सीमा नैताम, महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, पारिचारिका, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.