प्रश्नपत्रिकेचा फोटो मोबाईद्वारे पाठविला बाहेर

- शासकीय तंत्रनिकेतन केंद्रावरील गैरप्रकार
- 3 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
पथ्रोट, 
अचलपूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पुरवणी परीक्षा (Question Paper) सुरू असताना परीक्षा देत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका हाती पडताच प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलवर काढून बाहेर असलेल्या मित्रांना पाठवल्याचा गैरप्रकार शनिवारी घडला. भरारी पथकाने परीक्षार्थ्यांची तपासणी केली असता एका परीक्षार्थ्याकडे मोबाईल दिसून आला व हा प्रकार लक्षात येताच परतवाडा पोलिसांत तक्रार दिली.
 
Question Paper
 
परतवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर शनिवारी कॉम्प्यूटर इंजनिअरींग शाखेचा प्रोग्रामिंग विथ पायथॉन या विषयाचा पेपर (Question Paper) होता. परीक्षा सुरु झाल्यावर भरारी पथक तपासणीकरिता पोहचले असता पथक प्रमुख प्रा. एस. जी. गजभिये, प्रा. आर. एस. माजगावकर यांनी पर्यवेक्षक आशिष नागे यांना सोबत घेऊन परीक्षार्थ्यांची तपासणी केली असता एका परीक्षार्थ्याकडे मोबाईल दिसून आला. त्या मोबाईलची तपासणी केली असता परीक्षार्थ्यांना देण्यात आलेली प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या तंत्रनिकेतनच्या स्थापत्य(सिव्हील) शाखेचा विद्यार्थी मित्रास पाठवल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेतलेला मोबाईल त्याच परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असलेल्याचा होता. मोबाईलवरून बाहेर पाठविल्याच्या फिर्यादीवरून परतवाडा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
प्रशांत कांबळे, रा. अमडापूर, ता. सेलू जि. वर्धा, योगेश राठोड, रा. छोटा बाजार, परतवाडा व इशाक खान सौदागर रा. अन्सारनगर, परतवाडा, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत . सिद्धार्थ साकडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये पेपरचा फोटो काढून बाहेर असलेल्या इशाक खान सौदागर याला पाठविल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. याबाबत परतवाडा ठाण्याचे प्रभारी ठाणेदार प्रशांत गिते म्हणाले की, अचलपूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील गैरप्रकाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले व मोबाईल जप्त केला आहे. समजपत्रावर त्यांना सोडले असून तपास सुरू आहे.