शिंदे गटाच्या अमादारावर शिवसैनिकांचा हल्लाबोल

- अंजनगाव सुर्जी येथील घटना

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अंजनगाव सुर्जी, 
शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये (Shinde group) सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर रविवार, 25 सप्टेंबरला अंजनगाव सुर्जी येथील मठातून दर्शन करून निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल केला व ‘पन्नास खोके एकदम ओके’चे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
 
Shinde group
 
याबाबत माहिती अशी की, आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदे गटात (Shinde group) सामील होणारे आमदार होते. एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र अचानक दुसर्‍या दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान, रविवारी दुपारी 3 वाजता अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजताच्या सुमारास आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’चे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्क्या मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे, हे कळले नाही. सदर घटनेने काही वेळ लाला चौकात तणाव निर्माण झाला होता.
 
 
हल्ला नव्हे भ्याड हल्ला : बांगर
मी अंजनगावला माझी बहीण व पत्नीसह देवदर्शनासाठी आलो होतो. चौकात काही लोकांनी भ्याड हल्ला केला. यांना शिवसैनीक म्हणता येत नाही. शिवसैनीक छातीवरती वार करतो. त्यांना माझे आव्हान आहे कोण्या दिवशी यायचे ते त्यांनी सांगावे मी चौकात उभा राहतो.