टोले नांदगावच्या विद्यार्थ्यांनी शाळेला ठोकले कुलूप

- शिक्षक मिळत नसल्याचा संताप
- शाळा समितीच्या मागणीला केराची टोपली

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
गोंडपिपरी, 
तालुक्यातील टोले नांदगाव जिल्हा परिषद शाळेला (School) अनेकदा मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.
 
School
 
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या वेडगाव केंद्रात टोले नांदगाव जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. या शाळेत इयत्ता 1 ते 4 वर्गासाठी दोन शिक्षक होते. मात्र शाळेतील (School) एका शिक्षकांची प्रतिनियुक्ती शेजारील हिवरा शाळेत करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब पालकांच्या लक्षात आली. ही प्रतीनियुक्ती रद्द करुन या शाळेतील शिक्षक पुर्ववत ठेवण्यात यावा, यासाठी गावतील शाळा व्यवस्थापण समितीच्या पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
 
 
23 सप्टेंबरला शिक्षक शाळेत रुजू न झाल्यास दूसर्‍याच दिवशी म्हणजे 24 सप्टेंबरला शाळेला कुलूप लावू, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला होता. शनिवार दिवस उजडला. शाळाही भरली. मात्र शिक्षक आलेच नाही. विद्यार्थ्यांनी गुरुजींची बराच वेळ वाट बघितली. मात्र शिक्षक येईना. अखेर गावकर्‍यांनी संतप्त होऊन शाळेला कुलूप ठोकले. यावेळी दर्शनी भागात खरडा चिपकवला. त्यात आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आम्हाला हा मार्ग पत्करावा लागल्याचे नमूद करीत शिक्षक देईपर्यंत शाळा भरणार नसल्याचा निर्धारही व्यक्त केला. परंतु, हा प्रकार घडूनही शिक्षण विभागातील कुणीही अधिकार्‍यांनी शाळाला भेट देण्याची तसदी घेतली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
 
 
शिक्षक मिळेपर्यंत कुलूप कायम राहील : कोरडे
गावातील शाळेत गरज असताना शिक्षक इतरत्र पाठविणे चूकिचे आहे. ही गंभीर बाब लक्षात आणून देल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केल्याणे कुलूप ठोकावे लागले. शिक्षक देतपर्यंत शाळेला कुलूप लावून राहिल, असे टोले नांदगावचे माजी उपसरपंच अनिल कोरडे यांनी सांगितले.