मतांच्या कर्जाची सव्याज परतफेड करू - प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
सेलू, 
मागील अडीच वर्षात तयार झालेला विकासाचा बॅकलॉग दूर करण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार करेल. जनतेने मतांचे दान करून जे कर्ज (Vote Loan) दिले आहे, त्याची व्याजासह परतफेड केली जाईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
  
Vote Loan
 
ते तालुक्यातील घोराड येथे आज 25 रोजी आयोजित पं. दीनदयाल उपाध्याय जयंती व सेवा पंधरवडा निमित्त लोकार्पण व ज्येष्ठ नागरिक सन्मान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आ. डॉ. पंकज भोयर, भाजपाचे प्रदेश चिटणीस राजेश बकाने, आदी उपस्थित होते. बावनकुळे यांनी मन की बात कार्यक्रमाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदींकडून देशातील 130 कोटी जनतेच्या जीवनामध्ये होणारे बदल टिपून त्यांची माहिती देत असल्याचे सांगून ते म्हणाले, मोदींसोबत खा. तडस काम करतात. केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजना राबविण्यात ते पुढाकार घेत आहेत. तर युती सरकारच्या काळात आ. भोयर चांगली बॅटिंग काम करीत आहेत, असा उल्लेख त्यांनी केला.
 
 
बोरधरण प्रकल्पाचे रखडलेले काम, शेतकर्‍यांच्या वीज जोडणीचे प्रलंबित प्रस्ताव व संत केजाजी महाराज देवस्थानच्या विकासासाठी आ. भोयर यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिले आहेत. ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहू असे बावनकुळे यांनी सांगितले. युती सरकारच्या काळात वीज जोडणी कापली नाही. जे काम 15-20 वर्षे झाले नाही ते पूर्ण करण्याचा धडका सरकार व भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी लावला असल्याचेही ते म्हणाले.
 
 
मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना राबविली आहे. त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा. कोणताही दिव्यांग, वृद्ध व्यक्ती सरकारच्या या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी शिबिरे घ्यावीत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला जिपचे माजी सदस्य राणा रननवरे, सेलूचे माजी पंस सभापती अशोक मुंडे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शब्बीर अली सैय्यद, घोराडच्या सरपंच ज्योती घंगारे, हिंगणी ग्रापं सदस्य दामिनी डेकाटे, घोराडचे उपसरपंच चिंतामन महाकाळकर, बाजार समितीचे माजी संचालक विलास वरटकर, रामाजी भुरे, तारा तेलरांधे, वरूण पाठक, विकास मोटमवार, संकेत बाराई यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुष उपस्थित होते.