राज्यात सर्वाधिक मृत्यू डेंग्यूचे!

- दहा वर्षात 578 जणांनी गमावला जीव
- मलेरिया, एईएस आजारही धोकादायक

    दिनांक :25-Sep-2022
|
नागपूर,  
किटकजन्य आजाराचा विचार केल्यास राज्यात गेल्या सोडतीन वर्षांमध्ये डेंग्यूने सर्वाधिक मृत्यू (Dengue)झाले आहेत. त्यापाठोपाठ मृत्यूसाठी मलेरिया, एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (एईएस) आणि जपानी मेंदूज्वर हे आजारही धोकादायक ठरले आहेत, ही धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे.
  
Dengue
 
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत राज्यातील जलजन्य व किटकजन्य आजाराविषयी विविध प्रश्नांची विचारणा केली होती. याला उत्तरदाखल आरोग्य सेवा सहसंचालक एस. बी. खांडके यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात गेल्या दहा वर्षांमध्ये डेंग्यूने (Dengue) 578 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2019 ते जुलै 2022 या साडेतीन वर्षांमध्ये डेंग्यूने 101 लोकांचा, मलेरियाने 35 तर एईएस व जपानी मेंदूज्वराने प्रत्येकी 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूने 2019 मध्ये सर्वाधिक म्हणजे 49 मृत्यू झाले आहेत. तर 2019 आणि 2020 या दोन वर्षांमध्येच एईएस व जपानी मेंदूज्वराचे रुग्ण सापडले आणि काहींचा मृत्यू झाला. 2021 आणि 2022 मध्ये एईएस व जपानी मेंदूज्वर या आजाराचे राज्यात एकही रुग्ण मिळाले नाही.
 
 
हत्तीरोगाचे एक लाख रुग्ण
डेग्यू, मलेरिय, चिकणगुनिया, एईएस, जपानी मेंदूज्वर या आजारांच्या तुलनेत हत्तीरोगाचा एकही रुग्ण दगावला नसला तरी गेल्या तीन वर्षात राज्यात 1 लाख 31 हजार 509 हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आले. तर 50 हजार 493 असे सर्वाधिक रुग्ण 2019 या वर्षांत मिळाले.