कंपनीच्या प्रचाराकरिता आलेल्या इसमांनी महिलेला लुटले

    दिनांक :25-Sep-2022
|
हिंगणघाट,  
उजाला कंपनीच्या प्रचाराकरिता आल्याचे सांगत दोन अज्ञात इसमांनी एका महिलेच्या 25 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्यांवर हात साफ केल्याची (Robbed) घटना स्थानिक नेहरू वार्ड येथे 22 रोजी घडली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार करण्यात आली असून अद्याप आरोपी गवसले नाही.
  
Robbed
 
स्थानिक नेहरू वार्ड येथील सेवानिवृत नागरिक सुरेश कापसे (80) यांची पत्नी तसेच सून घरी असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या घरी हाक दिली. त्यांनी उजाला कंपनीच्या प्रचाराकरिता आलो असून सोन्या-चांदीचे भांडे स्वच्छ करून देतो, असे सांगितले. त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवितो म्हणून त्यांनी वृद्ध महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या मागून घेतल्या. एका स्टीलच्या डब्यात पाणी घेऊन त्यामध्ये लाल रंगाचे पावडर ओतले. त्यानंतर वृद्ध महिलेच्या 50 हजार रुपये किंमतीच्या बांगड्या डब्यात टाकल्या व झाकण बंद करून गॅसवर गरम करण्यास ठेवले. यादरम्यान फिर्यादीच्या सुनेला हात धुण्याचा साबण आणण्यास पाठवित डब्यातील दोन्ही सोन्याच्या बांगड्या उडवून तेथून पळ काढला.