अंजनगावातल्या 10 शिवसैनिकांना अटक

- आमदार बांगर हल्ला प्रकरण

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अंजनगाव सुर्जी, 
रविवारी हिंगोलीचे शिवसेना (Shiv Sainiks) शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अंजनगाव सुर्जी येथे देवनाथ मठात दर्शनाकरिता आले असता त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्लाबोल प्रकरणी 10 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
Shiv Sainiks
 
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे सुर्जी येथील देवनाथ मठामध्ये त्यांची पत्नी व बहिणीसह आले असता मठामधून निघाल्यानंतर काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर एकच हल्लाबोल करून नारेबाजी केली. सदर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. घडलेल्या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घेतल्याचे समजते. त्यामुळे पोलिस यंत्रणेचे चक्र वेगाने फिरले व या प्रकरणात शिवसैनिकांची (Shiv Sainiks) धरपकड रात्रीपासूनच सुरू होऊन 10 आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात पाठवले. आरोपीमध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख महेंद्र दिपटे, शहरप्रमुख राजेंद्र आकोटकर, युवासेना तालुका प्रमुख अभिजित भावे, गजानन चौधरी, गजानन हाडोळे, रविंद्र नाथे, गजानन विजेकर, शरद फिसके, मयूर राय, गजानन फाटे यांचा समावेश असून त्यांच्यावर भादवी 353, 143, 147, 149, 441, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. अटकेतील आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
या घटनेने राज्यात खळबळ उडाल्याने अमरावती जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक अंजनगांव पोलिस स्टेशनसमोर आले होते. यामध्ये जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, महानगर प्रमुख पराग गुडधे, तसेच पदाधिकारी गजानन वाकोडे, प्रमोद धनोकार, मनोज कडू, अंकुश कावडकर, तालुका प्रमुख कपिल देशमुख यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
पोलिस उपनिरीक्षक फिर्यादी
अंजनगांव सुर्जी शहरात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास स्थानिक शिंदे गटाचा एकही कार्यकर्ता मिळाला नसल्याची खमंग चर्चा असून या प्रकरणी शेवटी अंजनगांव पोलिस स्टेशनचा एक पोलिस उपनिरीक्षक फिर्यादी झाला, हे विषेश.
 
 
पोलिस उपनिरीक्षकाची अक्षम्य चूक
आ. संतोष बांगर यांच्या दौर्‍यातील बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिस स्टेशनचे एक उपनिरीक्षक व काही कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. बांगर यांच्या गाडीसमोर स्थानिक पोलिस स्टेशनचे बंदोबस्ताला असलेले वाहन होते. वाहनातील उपनिरीक्षकाला शिवसैनिक (Shiv Sainiks) येतांना दिसून आल्यानंतरही आणि घटनास्थळी शिवसैनिक उपस्थित असल्याची पूर्वकल्पना असतांनाही सदर उपनिरीक्षक व कर्मचार्‍याने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती दखल घेतली नसल्याची चर्चा आहे.