शिष्यवृत्ती व वसतीगृह समस्येबाबत 'अभाविप'ची निदर्शने

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
चंद्रपूर, 
ABVP protests : जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांची संपर्क साधल्यानंतर शिष्यवृत्ती व वसतीगृह संदर्भातील काही गंभीर मुद्दे समोर आल्याने याची दखल घेत अभाविप चंद्रपूर जिल्हाच्या वतीने सोमवार, 26 सप्टेंबर रोजी येथील समाज कल्याण अधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन अधिकार्‍यांना देण्यात आली.
 
ABVP protests
 
2021-22 या शैक्षणिक वर्षातील चंद्रपूर जिल्ह्यातील प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गातील शिष्यवृत्ती तसेच एससी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. या कारणामुळे महाविद्यालय विद्यार्थ्यांची टीसी, पदवी प्रमाणपत्र तसेच महाविद्यालयात असलेले प्रमुख कागदपत्रे देण्यास विद्यार्थ्यांना स्पष्ट नकार देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरिता अडचणी येत आहे. त्यामुळे तात्काळ शिष्यवृत्ती खात्यात वर्ग करण्यात यावी, जिल्ह्यातील वस्तीगृह व वस्तीगृह बाह्य विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे दोन वर्षापासून थकित असलेले विद्यावेतन लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सुपूर्द करण्यात यावे, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना नंतर परिस्थिती सामान्य झाली असल्याने जिल्ह्यातील सर्व वसतीगृह हे पूर्ववत करण्यात यावी. 
 
 
तसेच या वस्तीगृहामध्ये भोजन, ग्रंथालय, शैक्षणिक साहित्य, खेळण्याचे साहित्य आदी सुविधा पूर्ववत कराव्या, अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर राज्यात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप लवकरात लवकर करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. समाज कल्याण कार्यालयाने या समस्यांचे सात दिवसात निराकरण करून विद्यार्थी हितेशी निर्णय घ्यावा, अन्यथा समाज कल्याण कार्यालयावर विद्यार्थी आक्रोश करेल, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. यावेळी जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, सहसंयोजक जयेश भडघरे, कोष प्रमुख रोहित खेडेकर, पियुष बनकर, यश चौधरी, तन्मय बनकर, भूषण डफ, अमित पटले, प्रविण गिलबिले यांची उपस्थिती होती.