नांदगाव नगरपंचायतचा कारभार ‘रामभरोसे’

- अधिकृत अधिकारीच नाही

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
नांदगाव खंडेश्वर, 
नांदगाव खंडेश्वर येथे नगर पंचायत (Nagar Panchayat) अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शहरवासीयांसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समस्यांच्या संदर्भात दाद मागावी कुठे, असा संतप्त सवाल शहरातील नागरिक आता विचारू लागले आहेत. या नगर पंचायतीला गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसून फक्त कर्मचार्‍यांच्या भरवशावर चालविली जात आहे.
 
Nagar Panchayat
 
या नगर पंचायतचा (Nagar Panchayat) प्रभार धामणगाव रेल्वे येथील नगर परिषदेच्या मुख्यधिकार्‍यांकडे असून त्यांना येथे यायला वेळ मिळत नाही, तर प्रशासक म्हणून चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी आहेत; पण त्यांना येथील समस्येशी काहीही देणेघेणे नसल्याने ही नगर पंचायत शासनाने पूर्णतः वार्‍यावर सोडली आहे. शहरात दिवसेंदिवस समस्यांचा डोंगर उभा असल्याने त्या सोडवायला कुणालाही वेळ नाही. येथील कर्मचारी कार्यालयात कधीही दिसत नाही. फोन केला तर उचलत नाहीत; त्यामुळे शहरातील जनता या नगर पंचायतीला प्रचंड प्रमाणात त्रासली आहे.
 
 
येथील बसस्थानक परिसरात अमरावती ते यवतमाळ रोडवर मोकाट जनावरांचे झुंडचे झुंड बसले असतात. त्यामुळे वाहनचालकांना वाहन उभे करता येत नाही. त्यातच ही जनावरे वाहनांसमोर धावत असल्याने या परिसरात अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला नगरपंचायत कर्मचार्‍यांना वेळच नाही. फोन केला तर ते उचलतही नाहीत. येथील बसस्थानक परिसरात दोन प्रसाधनगृह नगरपंचायतने प्रवाशांच्या सोयीसाठी बांधले आहेत; मात्र त्यांची साफसफाई कधीही केल्या जात नाही. त्यामुळे या दोन्ही प्रसाधनगृहाची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरली आहे. यापैकी एक प्रसाधन गृह हे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासासमोरच आहे. या दुर्गंधीमुळे या परिसरात प्रवाशांना उभे राहणे कठीण झाले आहे. मात्र याकडे नगर पंचायतीच्या कर्मचार्‍यांना लक्ष द्यायलाच वेळ नसल्याचे दिसून येते.