आझादी से अंत्योदय तक मोहिमेत वर्धा देशातील पहिल्या 10 मध्ये

- उत्कृष्ट कामासाठी केंद्र शासनाने केला गौरव

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने देशातील 75 जिल्ह्यांमध्ये आझादी से अंत्योदय तक (Azadi Se Antyodaya Tak) ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात जिल्ह्याचा गौरव करण्यात आला आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज 26 रोजी पुरस्कार स्विकारला.
 
Azadi Se Antyodaya Tak 
 
दिल्लीत पार पडलेल्या या समारंभात केंद्रीय ग्रामविकास सचिन नागेंद्र नाथ यांनी या पुरस्काराचे वितरण केले. यावेळी केंद्र शासनाचे उपसचिव आशिष कुमार गोयल, संयुक्त सचिव जिम्पा भुटिया यांच्यासह केंद्र शासनाच्या नऊ विभागाचे अधिकारी व देशभरातील पुरस्कारास पात्र ठरलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हा परिषदेचे एमव्हीएसटीएफचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रवीण कुर्‍हे उपस्थित होते.
 
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 28 एप्रिल ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टपर्यंत 90 दिवस आझादी से अंत्योदय तक (Azadi Se Antyodaya Tak) ही मोहीम राबविण्यात आली होती. केंद्र शासनाने यासाठी निवडलेल्या 75 जिल्ह्यांमध्ये राज्यातील तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यात वर्धेसह नाशिक व रायगड या जिल्ह्याचा समावेश होता. मोहीम कालावधीत केंद्र शासनाच्या नऊ विभागाच्या 17 योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावयाचा होता. यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात आली होती.
 
 
जिल्ह्याने या कालावधीत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 17 पैकी 12 योजनांमध्ये जिल्ह्याने शंभर टक्के काम मोहीम कालावधीत पुर्ण केले. त्याची दखल घेत केंद्र शासनाच्या वतीने जिल्ह्याचा गौरव करण्यात आला आहे. मोहिमेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी नोडल अधिकारी म्हणून उत्तमपणे काम केले.