केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी

- प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पटोले यांची टिका
- पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी (Anti-farmer) असून शेतकर्‍यांच्या टाळू वरील लोणी खाणारे असल्याची टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणतर्फे सोमवारी आयोजित पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, सुनील देशमुख, आमदार वझाहत मिर्जा, काँग्रेस प्रदेश महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे, माजी आमदार नरेंद्रचंद्र ठाकरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, शुभांगी शेरेकर, भानुदास माळी, विलास अवताडे, प्रवीण देशमुख उपस्थित होते.
  
Anti-farmer
 
नाना पटोले पुढे म्हणाले, मनमोहन सिंह सरकारमध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी केली होती. परंतु, तडजोडीचे सरकार असल्याने स्वामीनाथन आयोग लागू करण्यात आला नव्हता. सध्याचे सत्तेवर असलेले केंद्र सरकार 56 इंची छाती समोर करून शेतकर्‍यांना न्याय देऊ, त्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करू, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देऊ आणि दुप्पट आधारभूत किंमत देऊ, असे पोकळ आश्वासन देऊन सत्तेवर आले आणि शेतकर्‍यांना (Anti-farmer) विसरले. राज्यातले सरकारही शेतकर्‍याच्या जीवावर उठले आहे. शेतकरी आत्महत्या करीत असताना मोदी मात्र आपले वाढदिवस मोठ्या थाटापाटाणे साजरे करीत आहे. केंद्र सरकारची सत्ता उलथून टाकण्यासाठी आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्याला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन बबलू देशमुख यांनी तर आभार बळवंत वानखडे यांनी मानले. दोन दिवसीय दौर्‍यात त्यांनी ग्रामीण व शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यासोबत चर्चा करून मंथन केले.
 
 
बबलू देशमुखांचे कौतुक
महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यात काँग्रेस पक्ष नंबर वन आहे, तो जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा असल्याचे सांगून त्यांनी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे कौतुक केले. जिल्ह्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. यापुढेही काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे. पुढचा खासदार आणि अमरावतीचा आमदार हा काँग्रेसचाच राहील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची भाषणे झाली.