मुलांची चौकशी करणार्‍याला चोपले

- चोरीच्या उद्देशाने आलेल्या संशयितास अटक

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
नांदगाव पेठ, 
एका लहान मुलाचा हात पकडून त्याला पत्ता विचारणार्‍या (Child interrogator) संशयित व्यक्तीला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी नांदगांव पेठ येथील झेंडा चौकात सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. नागरिकांनी पोलिसांना पाचारण करून त्या संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. तो चोरीच्या उद्देशाने गावात शिरल्याची माहिती नागरिकांनी दिली. पोलिसांनी अफवांवर दुर्लक्ष करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
  
Child interrogator
 
मुसाफीर खान नगिना खान (40),रा. सावता तोडा भटणी, ता. सालेमपुर जिल्हा देवरीया (उत्तरप्रदेश) असे त्या इसमाचे नाव असून रविवारी सायंकाळी बराच वेळ तो गावात फिरत होता. त्याच्या हालचालीवर काही जागरूक नागरिक लक्ष ठेवून होते. मुले चोरणार्‍या टोळीची अफवा सध्या सर्वदूर पसरलेली असून यामुळे नागरिक सुद्धा भयभीत झाले आहेत. त्यामुळे हा सुद्धा त्या टोळीचा सदस्य असावा असा संशय नागरिकांना आला. दरम्यान झेंडा चौकात त्याने एका लहान मुलाचा हात पकडून (Child interrogator) त्याला काहीतरी विचारले, तेवढ्यात नागरिकांनी त्याला पकडून चोप द्यायला सुरुवात केली.
 
 
त्याला माहिती विचारली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांचा संशय बळावला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नांदगांव पेठ पोलिसांच्या वतीने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत होते. नेमकी त्याच दरम्यान ही घटना घडली. पीएसआय डोपेवाड यांनी मुसाफिर खान नगिना खान याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. पोलिसांनी कलम 122 अन्वये त्या संशयितावर कारवाई करून त्याला अटक केली.
 
 
अफवांवर विश्वास ठेवू नये
सदर संशयित व्यक्तीची आपण सखोल चौकशी केली असून तो वेडसर इसम असल्याचे निदर्शनास येते. त्याच्यावर मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणताही संशय आल्यास नागरिकांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी केले आहे.