यवतमाळात पं. दीनदयाल उपाध्याय जयंती समारोह

- आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांना दीनदयाल संस्थेने आत्मसन्मानाची जाणीव करून दिली : डॉ. उदय निरगुडकर

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
माध्यमांमध्ये काम करणार्‍यांना यवतमाळ म्हटले की, शेतकरी आत्महत्याच डोळ्यांपुढे येतात. यवतमाळात आल्यावर मात्र दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने या आत्महत्या झालेल्या कुटुंबांमध्ये जागवलेला आत्मसन्मानही पाहायला मिळाला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी येथे केले. एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त यवतमाळलगत निळोणा येथील दीनदयाल प्रबोधिनीत आयोजित कार्यक‘मात ते बोलत होते.
  
Deen Dayal Upadhyay
 
दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, 25 सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध समाजसेवी डॉ. सुरेंद्र पद्मावार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक‘माच्या मंचावर पांचजन्य साप्ताहिकाचे प्रबंध संचालक आशिषकुमार खरे, दीनदयालचे अध्यक्ष नरहर देव, जिल्हा संघचालक विलास देशमुख, दीनदयालच्या उपाध्यक्ष ज्योती चव्हाण, डॉ. मनोज पांडे व सचिव विजय कद्रे होते.
 
 
डॉ. उदय निरगुडकर पुढे म्हणाले, आपल्या देशातील निसर्गपूजक आदिवासी समाजाला चोर, दरोडेखोर, खुनी ठरवून इंग‘जांनी गावकुसाबाहेर काढले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षार्ंत परिस्थिती थोडी बदलली असली तरी ती फक्त कागदावर दिसते. जमिनीवर अजूनही कंत्राटदार माफिया आणि संवेदनहीन अधिकारी यांच्या संगनमतातून आदिवासींना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाही. अशावेळी त्यांना केवळ एकदा मदत करून चालत नाही तर आत्मभान व आत्मसन्मान जागवून मदतीची व्यवस्था उभी करावी लागते आणि अशी व्यवस्था यवतमाळच्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने पारधी बांधवांच्या निमित्ताने उभी करून दाखवल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले.
 
 
इथल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक हा देश एक नव्हता असं खोटं पसरवलं. बि‘टिश आले नसते तर लोकशाहीच रुजली नसती असंही ठसवलं गेलं. प्रत्यक्षात, अडीच हजार वर्षांपूर्वीच इथे चाणक्याने पंचायतराज व्यवस्था सूत्ररूपाने मांडली होती. राजा हा उपभोगशून्य स्वामी, राज्य मात्र जनतेच्या इच्छेचे हे स्वरूप इथे प्रत्यक्षात अस्तित्वात होतं. रुडियाड किपलिंगने 1894 मध्ये मांडलेलं ‘मोगली’ नावाचं काल्पनिक पात्र इथे अबुजमाडच्या जंगलात चंदू मडावीच्या रूपाने प्रत्यक्ष अस्तित्वात होतं. परंतु दुर्दैवाने इथल्या माध्यमांनी ते बेदखल केलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
 
 
आपल्या आदिवासींना निसर्गाचं संरक्षण, संवर्धन करण्याचं नेमकं ज्ञान आहे. त्यांच्या साहित्यात, चालीरीतीत, सण-उत्सवात आणि जगण्यातही त्याचं प्रतिबिंब पहायला मिळतं. बोलीभाषांमध्येही तशा आशयाची गीतं आहेत. होळीच्या आधी झाडाचा आंबा काढू नये हेच कोकणातल्या लोकगीतातून सांगितले जाते. या भाषांचं संवर्धन झालं पाहिजे. अन्यथा पाश्चात्य संस्कृतीने ते सगळे दाबून टाकले तर निसर्गाचे संरक्षण करणारी आपली ही संस्कृती काळाच्या उदरात गडप होईल, अशी भीती डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केली.
 
 
ग्लोबलायझेशनच्या वरवंट्याखाली जगभरातले सगळे सारखे दिसायला लागले तर त्या त्या प्रदेशातलं वैशिष्ट्य नष्ट होऊन जाईल, ते थांबवलं पाहिजे, असेही ते म्हणाले. स्थलांतरामुळे आर्थिक स्तर उंचावतो असे वाटत असले तरी सांस्कृतिक स्तर मात्र प्रचंड खालावतो, त्याचं काय करणार असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, नकली मुखवट्यात अस्सल बीज कोमजल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. समाजसेवा ही शालीसारखी पांघरून चालत नाही तर ती त्वचेसारखी अंगभूत असावी लागते आणि त्यासाठी ‘दीनदयाल’सार‘या संस्थांमधून चालणारं काम पहावं लागतं, असे ते म्हणाले.
 
 
नऊ ते सहा काम करून वीकेंडला एन्जॉयमेंटसाठी खेड्यात जाणार्‍यांना ‘अहं’काराकडून ‘वयं’काराकडे नेणारे सेवाकार्य एखादी संस्था करू शकते, हे कळूच शकत नाही असे सांगून ते म्हणाले, याचा अर्थ समाजात काही चांगलं नाहीच असा होत नाही. अनेक लोक सेवाकार्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्याकरता तशी व्यवस्था मात्र उभी केली पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाने केवळ शहरी भागाचा विकास होत नाही तर ग‘ामीण भागातही मोठे परिवर्तन येऊ शकते याची असं‘य उदाहरणे त्यांनी आपल्या व्या‘यानातून दिली. आगामी काळामध्ये समाजाच्या अंतिम घटकापर्यंत विकासाची किरणं पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची आवश्यकताही डॉ. उदय निरगुडकर यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने प्रारंभ झालेल्या या समारोहात दीनदयालचे अध्यक्ष नरहर देव यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला. डॉ. सुरेंद्र पद्मवार यांनी अध्यक्षीय भाषणात अंत्योदय संकल्पना त्यांच्या शब्दात स्पष्ट केली. संचालन गजानन परसोडकर व मधुरा वेळुकर यांनी केले. डॉ. ललिता घोडे यांनी परिचय करून दिला. राकेश मते यांनी वैयक्तिक गीत सादर केले. ऋचा गढीकर यांच्या पसायदानाने कार्यक‘माची सांगता झाली. यावेळी रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे, आमदार मदन येरावार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार निलय नाईक, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, प्रांत सेवाप्रमुख सुनील मेहेर, डॉ. अशोक गिरी, सुलभा गौड यांच्यासह समाजाच्या विविध स्तरांतील नागरिक उपस्थित होते.