सारे शहर उजळून निघाले; देवीभक्तांमध्ये प्रचंड उत्साह

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
Devotees : शहरातील कोणताही भाग देवीशिवाय सुटत नाही. चौकचौक आणि गल्ली गल्लीत आदीशक्तीचे मंडप दिसून येतात... लहानथोर, घर घर आणि मोहल्ला मोहल्ला आठ दिवस देवीच्या भक्तीत (Devotees) तल्लीन झालेले दिसून येतात. दुर्गा देवीच्या स्वागताची तयारी पितृपक्ष लागण्यापूर्वीपासून शहरात सुरू झाली होती. काल सायंकाळपर्यंत सजावटीचे काम सुरू होते. आज सकाळपासूनच ढोल ताशांच्या निनादात अंबे अंबे जय जगदंबे, बोलो दुर्गा माता की जय च्या जय घोषात देवीभक्तांनी दुर्गामातेला मंडपात आणले. पावसाने विश्रांती घेतल्याने देवीभक्तांमध्ये प्रचंड उत्साह होता. रात्रीपर्यंत देवीची स्थापना सुरू होती.
 
Devotees
 
जिल्ह्यात आश्‍विन नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. प्रत्येक गावातील दुर्गा मंडळाने आपले विशेषत्व जोपासले आहे. दुर्गेचा श्रृंगार करण्यासाठी अनेकांनी कालच देवी मंडपात नेली होती. आज सकाळपासूनही ढोल ताशांच्या गजरात विविध मंडपात देवीचे आगमण झाले. जिल्ह्यात 1 हजारापेक्षा जास्त ठिकाणी सार्वजनिक दुर्गाची स्थापना करण्यात आली.
 
 
वर्धेतील दुर्गोत्सोव आकर्षण असल्याने मंडप सजावटीसाठी राजस्थानसह बाहेर राज्यातून कारागिर बोलवण्यात येतात. दुर्गापूजा उत्सव समितीच्या वतीने विद्युत रोषणाईवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. एका मंडळाची रोषणाई संपत नाही तोच दुसर्‍या मंडळाची विद्युत रोषनाई लागत असल्याने सारे शहर उजळून निघालेले असते. वंजारी चौकातील देवीच्या मंदिरही उजळून निघाले. वं. मावशी केळकर यांनी स्थापन केलेल्या देवी अष्टभूजा मंदिरातही नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी चौकाचौकात बंदोबस्त लावण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात गरबा नृत्याचे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात होतात. शहरात ठिक ठिकाणी गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
पोटच्या वर नको...
शहरात दुसर्‍या तिसर्‍या दिवशीपासून लंगर लावण्याची प्रथा असून त्यातही स्पर्धा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिक दुर्गोत्सव पाहण्यासाठी येत असतानाच लंगरच्या रांगेत लागतात. शहरात रोज अनेक ठिकाणी लंगर लागत असल्याने अनेक जण चव घेऊन बाकी अक्षरश: रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे लंगर लावतानाही देवीभक्तांनी श्रद्धेच्या पल्याड जाऊन पोटापूर्तेच देण्यावर भर दिल्यास अन्नाची नासाडी होणार नाही, याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय जन जागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे म्हणाले.