रामदासपेठेतील गरबा ‘डीजे’विना

- पारंपारिक पद्धतीने उत्सव करा
- उच्च न्यायालयाचे आदेश

    दिनांक :26-Sep-2022
|
नागपूर, 
रामदासपेठ दगडी पार्क जवळील गरबा (Garba) उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच या उत्सवात डीजे आणि लाऊडस्पीकर वाजविण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे रामदासपेठेतील गरबा उत्सव यंदा डीजे आणि लाऊडस्पीकरविना करावा लागणार आहे.
 
Garba
 
रामदासपेठ येथील रहिवासी पवन सारडा, राहुल दालमिया व डॉ. शुभांगी देशमाने यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, रामदासपेठ प्लॉट ओनर्स अ‍ॅण्ड रेसिडेंट असोसिएशनच्या वतीने मोर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानात 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान नवरात्रीनिमित्त गराबाचे आयोजन करण्यात आले आहे. या गरबा आयोजनला मनपा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, या नवरात्र उत्सवात गरबामध्ये (Garba) वाजविण्यात येणारे लाऊडस्पीकर आणि डीजेमुळे परिसरातील शांतता भंग होते. तसेच या कर्कश आवाजाचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रामदासपेठेतील गरबा आयोजन थांबविण्यात यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मागील सुनावणीला न्यायालयाने यावर मनपा प्रशासनासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार आज सोमवारी न्या. सुनिल शुक्रे व न्या. गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत वरीलप्रमाणे आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राहुल भांगडे तर मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.
 
परवागनीवरून पोलिसांना फटकारले
रामदासपेठेतील गरबा उत्सवासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल असताना सीताबर्डी पोलिसांनी हा उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिली. पोलिसांचा न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप लक्षात घेता न्यायालयाने याप्रकरणात पोलिसांना चांगलेच फटकारले, तसेच तुमच्याविरुद्ध अवमान कारवाई का करण्यात येऊ नये अशीही विचारणा केली.