लम्पीचा धसका, व्यावसायिकांना फटका

- आजार दुधातून होत नसल्याचे पशुसंवर्धन विभागाची माहिती

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
वडनेर, 
लम्पी (Lumpy) आजाराबाबत नागरिकांमध्ये अनेक समज- गैरसमज आहेत. त्यामुळे काही लोकांनी दूध घेणे व पिने बंद केले असून याचा फटका वडनेर भागातील तसेच तालुक्यातील दुग्ध व्यावसायिकांना बसला आहे. लम्पीचा फैलाव दुधापासून होत नाही. याबद्दल वडनेरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन खेमलापुरे यांनी माहिती दिली आहे. तरीही लोकांमध्ये चिंता कायम आहे.
Lumpy 
 
लम्पी (Lumpy) रोगाबाबत नागरिकांत भीती असून दुधातून सुद्धा आजार पसरत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भीतीपोटी अनेक दूध घेणार्‍यांनी दुधाचे उकडे बंद केले आहेत. परिणामी दुधव्यवसायिकांवर परिणाम झाला आहे. दरम्यान तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना लंपी सदृश्य बाधित जनावरे आढळल्यास योग्य ते उपचार करणे विलगीकरण करणे, नमुने गोळा करणे व तत्काळ प्रयोगशाळेत पाठविणे, आजारी जनावरांचा दैनंदिन अहवाल तयार करणे, उपचार करणे, तसेच लसीकरण करणे आधी उपाययोजना केल्या जात आहे. विशेष म्हणजे दुधातून आजार पसरत नसल्याची जनजागृती करूनही काही नागरिक अफवांवर विश्वास ठेवत असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
बिनधास्त प्या दूध
लंपी आजार हा दुधापासून होतो ही अफवा असून बिनधास्त दूध प्यावे. आपण दूध 100 डिग्री सेल्सिअन्सच्यावर उकळून घेतो. त्यामुळे या तापमानात कोणताही विषाणू जिवंत राहू शकत नाही. लम्पी मुळे दुधाच्या गुणवत्तेवर कसलाही परिणाम होत नाही. तसेच लम्पी हा त्वचारोग असून तो फक्त गायवर्गीय जनावरांना होत आहे. सध्या तरी कोणत्याही जनावरांना लम्पीचा संसर्ग झालेला नाही. पशुपालकांनी गोठ्यात स्वच्छता ठेवावी. औषधाची फवारणी करावी. बाधित जनावरे आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभाग तसेच नजीकच्या पशु दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन खेमलापुरे यांनी आवाहन केले आहे.