भक्तांच्या मांदियाळीत माहुरगडावर नवरात्र महोत्सवाला प्रारंभ

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
श्रीक्षेत्र माहूर,  
Mahurgad : महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीरेणुकादेवी मंदिरात सोमवार, 26 सप्टेंबरला सकाळी 10 च्या सुमारास घटस्थापना झाली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश शशीकांत बांगर, सचिव तथा अपर जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते. पूजाविधीचे पौरोहित्य पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले.
  
Mahurgad
 
घटस्थापनेच्या दिवशी स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्व असल्याने अध्यक्ष शशिकांत बांगर यांनी सपत्नीक कुमारीकापूजन केले. घटस्थापनेप्रसंगी संकल्प सोडताना त्यांनी, राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडणार्‍या सैनिकांना आरोग्य, शक्ती प्रदान कर, बळीराजा व रेणुकाभक्तांना समृद्ध कर, त्यांच्याभोवती रेणुकाकवच राहू दे, असे मातेला साकडे घातले. छबीना काढून परिसर देवता पूजन झाले. त्यानंतर मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आला.