जिल्ह्यात नवरात्रौत्सवाला जल्लोशात प्रारंभ

- भक्तीभावात नवदुर्गा मूर्ती, घटस्थापना

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
जिल्ह्यात नवरात्रौत्सवाला (Navratri festival) आज जल्लोशात प्रारंभ झाला. यंदा दोन वर्षांनंतर कोरोना संसर्गाचे निर्बंध नसल्याने आगामी नऊ दिवस जिल्ह्यात माता भगवतीच्या जागरणासह विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद नागरिक घेणार आहेत.
Navratri festival 
 
जिल्ह्यात आज 408 सार्वजनिक ठिकाणी दुर्गादेवीची मूर्ती बसविण्यात आली असून शेकडो मंदिरात घटस्थापना करण्यात आली. गोंदिया शहरातील नवरात्रौत्सव (Navratri festival) शेजारील जिल्ह्यांसह दुर्ग, डोंगरगड व बालाघाट जिल्ह्यात प्रसिध्द आहे. येथील भगवतीच्या भव्य व आकर्षक मुर्त्या, कल्पक मंडप व देखावे, रोषनाई यासह नऊ दिवस चालणारा उत्सव नेहमीच भक्तीसह आकर्षण राहिले आहे. मात्र कोरोना संसर्ग निर्बंधामुळे मागील दोन वर्ष नवरात्रोत्सव उत्सवावरही निर्बंध होते. मात्र यंदा निर्बंध नसल्याने शहरासह जिल्ह्यात माता भगवतीच्या जागरणाची जय्यत तयारी झाली आहे.
 
 
आज सकाळपासूनच बाजारपेठेत पुजा साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर जिल्ह्यावर पावसाचे सावट असल्याने अनेक मंडळांनी सकाळपासूनच दुर्गा मूर्ती वाजतगाजत मंडपात आणण्यास सुरुवात केली होती. तसेच शेकडो मंदिरात मातेचे पुजन करुन घटस्थापनेला सुरुवात झाली होती. जिल्ह्यात आगामी नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद जिल्ह्यावासी घेणार आहेत.
 
 
जिल्ह्यात गोंदिया, खरोबा, गढमाता, सेमोदेमो देवी, मांडोदेवी, देवरीचे माता धुकेश्वरी मंदिर, ससेकरण, बोंडगावदेवी आदी मंदिरात नवरात्रौत्सवादरम्यान आयोजित होणार्‍या यात्रा भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. येथे उत्सवादरम्यान धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित होतात. त्यामुळे दोन वर्षानंतर या यात्रास्थळी नागरिकांची गर्दी पहायला मिळणार आहे.
 
 
जिल्ह्यात नवरात्रौत्सवदरम्यान आयोजित रासगरबा व दांडिया नागरिकांचे आकर्षण ठरते. यंदा बहुतांश ठिकाणी रासगरबाचे आयोजन करण्यात आले असून तयारीही पूर्णत्वास येत आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छूकांची कपडे व साहित्य खरेदीसाठी संबंधित दुकानात गर्दी होत आहे.