हैदराबाद-जयपूर विशेष रेल्वेला प्रतिसाद

- ऑक्टोबर अखेरपर्यंत वाढविली फेरी

    दिनांक :26-Sep-2022
|
अकोला,
Special Railway : हैदराबाद ते जयपूर या दोन शहरांदरम्यान धावणार्‍या 07115 हैदराबाद-जयपूर या साप्ताहिक गाडीला मिळणारा प्रतिसाद व या मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी पाहता दक्षिण-मध्य रेल्वेने या गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात या गाडीच्या आणखी चार फेर्‍या होणार आहेत.

Special Railway
 
गाडी क्र. 07115 हैदराबाद-जयपूर व 07116 जयपूर-हैदराबाद या विशेष गाड्या अनुक्रमे 1 व 3 जुलैपासून सुरू करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्यांना ऑगस्टमध्ये मुदतवाढ मिळाल्याने त्या अनुक्रमे 30 सप्टेंबर व 2 ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आल्या होत्या. आता या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 07115 हैदराबाद-जयपूर ही विशेष गाडी 7 ते 28 ऑक्टोबर या काळात दर शुक्रवारी रात्री 8.20 वाजता हैदराबाद येथून निघून शनिवारी पहाटे 5.40 वाजता अकोला रेल्वे स्थानकावर येऊन पुढील प्रवासासाठी रवाना होईल.
 
त्याचप्रमाणे 07116 जयपूर-हैदराबाद ही साप्ताहिक विशेष गाडी 9 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत दर रविवारी जयपूर येथून दुपारी 3.20 वाजता निघून सोमवारी दुपारी 3.10 वाजता अकोला स्थानकावर आल्यानंतर हैदराबादसाठी रवाना होईल.