सुलभा खोडके यांची काँग्रेसमध्ये अवहेलना

- सोनिया, राहूल गांधींकडे करणार तक्रार
- कोणत्याही बैठकीचे निमंत्रण नाही

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपातून काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केल्यानंतर मला काँग्रसेच्या कोणत्याही बैठकीला बोलावण्यात आले नाही व सतत अवहेलना होत राहिली. याची आपण दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियंका गांधी व अन्य श्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्ट केले आहे.
 
Congress
 
नुकतेच 25 व 26 सप्टेंबर रोजी Congress पक्षाच्या आढावा बैठकीकरिता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावतीत आले होते. त्यावेळी सुलभा खोडके उपस्थित नसल्याने हा मुद्दा समोर आला होता. याचा खुलासा करताना सुलभा खोडके म्हणाल्या की, नाना पटोलेंची भेट मी घेऊ शकले नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, परंतु भाजपाच्या माजी आमदारांनी 18 जून 2021 ला काँगेस पक्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आजपर्यंत मला स्थानिक नेते व पदाधिकार्‍यांकडून कोणत्याही बैठकीला बोलाविण्यात आले नाही. तसेच पटोले यांच्या दोन दिवसाच्या अमरावती दौर्‍या संदर्भात सुद्धा शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी कळविले नाही. यापूर्वी देखील मुंबईला नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना आपण अवगत केले आहे.
 
 
अमरावती दौर्‍यात पटोले यांना पत्रकार परिषदेमध्ये माझ्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, तो आमचा काँग्रेस पक्षातील अंतर्गत विषय असून तो आम्ही बसूनच सोडवू अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. याच पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीमधील काही नगरसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नव्याने प्रवेशित नगरसेवकांच्या आगामी उमेदवारीबाबत सुद्धा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, पटोले यांनी सांगितले की, स्थानिक स्तरावर कोणतीही उमेदवारी दिली जाणार नाही. या संदर्भात प्रथम शहराध्यक्षांकडे सर्वजण अर्ज करतील व नंतर आम्ही सर्व्हे करून व मेरीटनुसारच उमेदवारी देऊ. या सर्व बाबींबाबत सुलभा खोडकेंनी पटोले यांचे आभारही मानले. त्या पुढे म्हणाल्या की, पुढील आठवड्यात मी मुंबईमध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व अन्य वरिष्ठांची भेट घेऊन भावना मांडणार आहे. तसेच नजीकच्या काळात दिल्ली येथे जाऊन सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी व इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन अमरावतीच्या काँग्रेसमधील माझी अवहेलना होत असल्याबाबत अवगत करणार आहे.
 
 
पुन्हा उमेदवारी मिळण्याचा आत्मविश्वास
मी आजपर्यंत कधीही काँग्रेस (Congress) पक्षाची विचारधारा सोडून कोणत्याही पक्षात गेली नाही. मी वर्ष 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोनिया गांधींनीच उमेदवारी दिली होती. तेव्हा पराभव झाला तरी 2019 मध्ये पुन्हा काँग्रेस पार्टीकडूनच अमरावती मतदार संघातून निवडणूक लढवीत विजयी झाले. भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 20 हजार मतांनी पराभव केला. काँग्रेस पार्टीने दोनवेळा उमेदवारी दिल्याबद्दल सोनिया गांधी व इतर ज्येष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करते. मी काँग्रेस पक्षामध्येच आहे, तसेच पक्षामध्येच राहील व काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवणार आहे. माझे काम पाहून ते मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी देतील, असा मला पूर्ण आत्मविश्वास असल्याचे त्या म्हणाल्या.