अन् ‘त्याला’ पाहताच ‘त्यांचे’ आनंदाश्रू अनावर झाले

- हरवलेला बालक पालकांच्या स्वाधीन
- अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्न

    दिनांक :26-Sep-2022
|
अकोला, 
Tears of Joy : नागपूर येथून हरवलेला 14 वर्षीय बालकास शनिवार, 10 सप्टेंबर रोजी अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आणि त्याला पाहताच त्या आईवडिलांचे आनंदाश्रू अनावर झाले. अकोला रेल्वे स्थानकावर चाईल्ड लाईनच्या टीमला हा बालक भटकताना निदर्शनास आला. या बालकास विचारपूस करून बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार शासकीय बालगृह, अकोला येथे दाखल करून त्याचा सांभाळ करण्यात आला.
 
Tears of Joy
 
संरक्षण अधिकारी सुनील लाडुलकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली की, 25 एप्रिल रोजी अकोला रेल्वे स्टेशन येथे 14 वर्षीय बालक भटकताना निदर्शनास आला. रेल्वे स्टेशन येथील चाईल्ड लाईनच्या चमूने या बालकास विचारपूस केली मात्र तो काही सांगण्यास तयार नव्हता. केवळ ‘घर को नही जाना है’ असे वारंवार सांगत होता. त्याच्या बोलीभाषेवरून तो हिंदी भाषिक असावा.
 
या बालकाचे कुटुंब शोधण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध कार्य सुरू करण्यात आले. या कालावधीत हरविलेल्या बालकास वर्ग सहावीमध्ये दाखल करण्यात आले. यादरम्यान बालगृहामधील बालकांना संत्री वाटप करताना या बालकाने ‘हमारे नागपूर की संत्री प्रसिद्ध है’ असे उद्गार काढले. त्याच्या या वाक्यानी बालगृहातील अधीक्षिका जयश्री वाढे व समुपदेशक नंदन शेंडे यांनी बालकाला विश्वासात घेत विविध माध्यमांतून त्याचा घरचा पत्ता माहिती करून घेतला.
 
 
या पत्त्यावर नागपूर येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व समुपदेशक अनिल शुक्ला यांनी भेट देऊन शोध घेतला. परंतु बालकाच्या पालकाचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर समुपदेशक नंदन शेंडे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे बालकाने सांगितलेला भाग दाखविण्यात आला. त्या बालकाने लगेच या भागात राहत असल्याबाबत सांगितले. व्हिडीओमध्ये दाखविलेल्या भागाचा अचूक माहितीनुसार समुपदेशक अनिल शुक्ला यांनी त्यांच्या आईवडिलांचा शोध घेतला. बालक व त्यांच्या आईवडिलांशी व्हिडीओ कॉलद्वारे प्रत्यक्ष दाखवून ओळख पटविण्यात आली. हरविलेल्या बालकाचा चेहरा दिसताच त्यांच्या आईवडिलांचे आनंदाश्रू (Tears of Joy) अनावर झाले.
 
हा बालक गेल्या सहा महिन्यांपासून परिवाराच्या संपर्कात नव्हता. अखेर सर्व सोपस्कार पूर्ण करून बालकल्याण समितीच्या आदेशानुसार या बालकाला 10 सप्टेंबर रोजी त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला व नागपूर तसेच शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, चाईल्ड लाईन यांच्या प्रयत्नाने हरविलेल्या बालकाला आईवडिलांचे वात्सल्य पुन्हा मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.