एसटी आणि टेम्पोचा भीषण अपघात

- एक जागीच ठार : तर बारा जखमी

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
उमरखेड, 
मराठवाड्यातील कंधार डेपोच्या नागपूरला जाणार्‍या एसटी व टेम्पोचा समोरासमोर अपघात (Terrible accident) होऊन यात एकजण जागीच ठार, तर बाराजण जखमी झाल्याची घटना आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान शहराजवळील मार्लेगाव फाट्यावर घडली. यातील गंभीर जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
 
Terrible accident
 
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार डेपोतील कंधार-नागपूर एसटी क्रमांक एमएच40 एन9634 नागपूरकडे जात असताना उमरखेडजवळ मार्लेगाव फाट्याजवळ विरुद्ध साईडने येणार्‍या टेम्पो क्रमांक एमएच26 एच9821 ने समोरासमोर धडक दिल्याने टेम्पोमधील एकजण जागीच ठार झाला. तर एसटीतील 9 जण, तर टेम्पोमधील 4 जण जखमी झाले. यातील सहाजणांना हदगाव व नांदेड येथे उपचारार्थ दाखल केले आहे.
 
 
संतोष गंगाधर काळबांडे (वय 38, हदगाव, जि. नांदेड) हा या अपघातात (Terrible accident) जागीच ठार झाला असून सविता आनंद नरवाडे (वय 37, पिंपळगाव ता. उमरखेड), सीमा जामोदकर (वय 34), रोशनी जामोदकर (वय 25, दोन्ही रा. मुगट, ता. मुखेड), जनाबाई धोंडिबा कांबळे (वय 60), वत्सलाबाई बळीराम काळे (वय 75) दोन्ही रा. येळेगाव, ता. कळमनुरी, कपिल दिलीपराव साळवे (वय 29, रा. डोलारी, ता. हिमायतनगर), मारुती माधव शिंदे (रा. कुपटी ता. माहूर), एसटीचा चालक विठ्ठल व्यंकटी मुंडे (वय 40, कंधार), मारुती टिकाराम नरवाडे (वय 75, वाटेगाव, ता. हदगाव) यामध्ये जखमी असून यांना उमरखेड रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले होते.
 
 
त्यापैकी विठ्ठल व्यंकटी मुंडे व मारुती टीकाराम नरवाडे यांना नांदेड येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. टेम्पोतील चार जखमींना हदगावला उपचारार्थ नेले. टेम्पोत बांधकामासाठी सेंट्रिंग नेत असल्याने मृतक मजूर असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास एपीआय प्रशांत देशमुख व जमादार अंकुश दरबस्तवार करीत आहेत.