रबी हंगामासाठी बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता ठेवा : जिल्हाधिकारी

- रब्बीसाठी 1 लाख 80 हजार हेक्टरचे नियोजन

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे रबी हंगाम (Rabi season) शेतकर्‍यांकरिता अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकर्‍यांना रब्बी हंगामात लागणारे बियाणे व खताची उपलब्ध करून द्यावी. तसेच सिंचन प्रकल्पांच्या ज्या गावांपर्यंत पाणी जाते, अशा गावांची प्राधान्याने निवड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृषी विभागाला केल्या आहे.
 
Rabi season
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रबी हंगाम (Rabi season) नियोजन व जिल्हा बियाणे समितीच्या सभेत रबी हंगामाचा आढावा घेताना त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत, सतीश सांगळे, तंत्र अधिकारी रश्मी जोशी, अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाने, कार्यकारी अभियंता रवी वर्‍हाडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. जीवन कतोरे, महाबीजचे व्यवस्थापक राठोड, कृषी व्यवसाय संघाचे अध्यक्ष, रवी शेंडे, एनएससी नागपूर येथील व्यवस्थापक नितीन मोरानिया, कृभकोचे जिल्हा प्रतिनिधी राहंगडाले, कृषी विकास अधिकारी कार्यालयाचे बमनोटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी घायतिडक, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जिल्हा सल्लागार, गौतम मून, तंत्र सहाय्यक स्वप्नील बाभुळकर, सचिन देवकते, विशाल वाघ आदी उपस्थित होते.
 
 
शेतकर्‍यांना जास्तीत जास्त क्षेत्रावर बीबीएफद्वारे पेरणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. रबी हंगाम सुरळीत पार पाडण्याच्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना कृषी विभागाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या. यावेळी डॉ. विद्या मानकर यांनी रबी हंगामात जिल्ह्यात 1 लाख 80 हजार हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यात हरभरा 1 लाख 13 हजार 690 हेक्टर, गहू 59 हजार 780 हेक्टर तर उन्हाळी भुईमुगाचे 4 हजार 150 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.
 
 
कृषी विभागांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामध्ये हरभरा 340 हेक्टर, ज्वारी 480 हेक्टर व तेलबियांमध्ये करडई 100 हेक्टरवर पिकाचे 100 टक्के अनुदानावर प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत 2 हजार 500 रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे शेतकर्‍यांना बियाणे उपलब्ध होणार आहे. त्याकरिता शेतकर्‍यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचेही डॉ. विद्या मानकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी हरभरा, गहू, ज्वारी तसेच तेलबियामध्ये करडई, तिळ व जवस आदी पिकांच्या बियाण्यांच्या व खताच्या उपलब्धतेबाबत तसेच रबी व उन्हाळी हंगामाकरिता उपलब्ध सिंचन क्षमतेबाबत सविस्तर आढावा घेतला.