शिरपूरचे जागृत प्राचीन श्री आई भवानी देवस्थान

    दिनांक :26-Sep-2022
|
अनंत देशमुख
शिरपूर जैन, 
शिरपूर जैन हे मालेगाव तालुयातील मोठे गाव आहे. येथील प्राचीन देवस्थान म्हणून श्री आई भवानी जगदंबा माता संस्थान हे जागृत व प्रख्यात आहे. येथे नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. त्यात विशेष करून नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी वर्दळ येथे असते. या संस्थानला जागृत देवस्थान म्हणून सुध्दा परिसरात मान्यता आहे.
 

hfg 
 
शिरपूर येथे श्री भवानी संस्थान बरोबरच इतरही देव देवतांचे व संत महात्म्यांचे मंदिरे आहेत. मात्र, यामध्ये अग्रगण्य श्री आई भवानी संस्थांन आहे. सदर संस्थान हे गावाच्या दक्षिण बाजूस निसर्गरम्य परिसरात वसलेले असून हे मंदिर अतिप्राचीन आहे.जानगीर महाराज संस्थांनचे तृतीय मठाधिपती ओंकारगिर महाराज यांनी उत्सवास सुरुवात केल्याचे गावकरी सांगतात. सदर मंदिर हे पूर्वी छोट्या स्वरूपात व प्राचीन होते. मात्र माजी आ. विजयराव जाधव यांनी सदर मंदिरास सभामंडप उभारून दिला व त्याच वेळी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. ह्या संस्थानातील देवीची मूर्ती ही रेणुका माते सारखी असून, मंदिराचे द्वार हे पूर्वाभिमुख आहे. तर मंदिर परिसरात बारमाही पाण्याचे बारव असून, समोरच अति प्राचीन दीपमाला आहे. सद्या नवरात्र उत्सव सुरू झाल्याने संस्थांनच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व भागवत सप्ताह उत्सव प्रारंभ झाला आहे. वाचक सुधाकर पंत दीक्षित महाराज आहेत .
 
 
२६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता संस्थांनचे प्रमुख प्रदीप देशमुख यांच्या हस्ते आई भवानी ची पूजा, अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली. मागील दोन वर्षा पासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने जास्त भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येऊ शकले नाहीत. परंतु यावर्षी शासनाने मोकळ्या वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिली आहे. गर्दी टाळण्यासाठी नवरात्रोत्सव काळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. या मंदिराला फार पुरातन इतिहास लाभलेला असल्याचे वयोवृद्ध मंडळी व जाणकाराकडून सांगण्यात येते. श्री आई भवानी मंदिर परिसरात श्री गजानन महाराज मंदिर, श्री बलखंडी हनुमान मंदिर तसेच महादेवाचे मंदिर आहे. देशमुख परिवाराच्या वतीने मंदिराचा कारभार चालवण्यात येतो.