- पशू-पक्ष्यांबाबत केली जातेय् जनजागृती
- देशातील 22 संरक्षित क्षेत्रात कार्यव्याप्ती
दिनांक :01-Jan-2023
Total Views |
- निखिल केळापुरे
नागपूर,
निसर्गात मानवासह असंख्य वनस्पती, (Wild-CER Elgar) पशू-पक्षी व सूक्ष्मजीव आढळतात. मानव वगळता इतर सजीव प्राणी एकमेकांच्या साह्याने सुखरुप जीवन जगतात. परंतु मानवाने स्वहितासाठी निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे सुरू केले. परिणामी अनेक वन्यजीव, पक्ष्यांच्या प्रजाती संकटात सापडल्या आहेत. या संकटग्रस्त प्रजाती आणि वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, तसेच जखमी झालेल्या पशुपक्ष्यांचे प्राण वाचावे यासाठी कार्य करण्याचा निर्णय पशुवैद्यक डॉ. बहार बावीस्कर यांनी घेतला आणि कार्याला सुरुवात झाली. हळूहळू या कार्यासोबत वन्यजीवप्रेमींची नाळ जुळू लागली आणि वाईल्ड- सीईआर संस्थेचा उदय झाला. आज या संस्थेने देशातील 22 संरक्षित क्षेत्रात कार्यविस्तार केला असून, (Wild-CER Elgar) वन्यजीवांच्या संरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे.
2012 मध्ये अस्तित्वात आलेल्या (Wild-CER Elgar) वाईल्ड- सीईआरची संरक्षण, शिक्षण, संशोधन आणि रेस्क्यू ही चार प्रमुख उद्दिष्टे आहेत. जखमी वन्यजीव व पक्ष्यांवर उपचार करून त्यांचा जीव वाचविला जातो. आजवर या संघटनेने 250 प्रजातींच्या पक्ष्यांवर उपचार करून, त्यांना वनजीवन प्रदान केले आहे. 15 प्रजातींच्या सापांना रेस्क्यू करण्याची कामगिरीही संघटनेने यशस्वी केली आहे. संकटग्रस्त गिधाडांसाठी संरक्षक आराखडा, नवेगाव नागझिरा सारख्या क्षेत्रात वाघाचे संगोपन, वन्यजीवांची संख्या वाढविण्यासाठीचे प्रयत्न तसेच स्थानिक पातळीवर केलेल्या नियोजनाची अंमलबजावणीचे कामही या संघटनेने आपल्या खांद्यावर घेतले आहे.
वन्यजीवांचे आजार, त्यामुळे होणारे मृत्यू, शिकार प्रकरणे अशा स्थितीत कसे कार्य करायचे, जैविक न्यायवैद्यक नमुने कसे गोळा करायचे, ते प्रयोगशाळेपर्यंत कसे पोहोचवायचे याबाबतचे प्रशिक्षण वनकर्मचारी व अभयारण्यालगतच्या स्थानिक पशुवैद्यकीय अधिकार्यांना संस्थेच्या माध्यमातून दिले जाते. याशिवाय सामान्यांना विविध पद्धतीने निसर्गाची माहिती, पक्षी निरीक्षण, कीटक सर्वेक्षण, शाळेतील विद्यार्थ्यांना वन्यजीवांविषयी माहिती देणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे, जंगल आणि जंगलातील प्रजातींना वाचविण्यासाठीचे मार्गदर्शन सामान्यांना विविध उपक‘माच्या माध्यमातून दिले जाते. वन्यप्राण्यांमध्ये होणारे आजार व उपचार तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, याचे संशोधन (Wild-CER Elgar) वाईल्ड-सीईआर संस्थेने केले आहे. नीलगाय व हनुमान लंगुर अशा प्राण्यांमधील आजारांची नोंद तसेच साप व घोरपडीवरील गोचिडीची नोंद, संस्थेने संशोधनांती केली असून, याबाबत विविध शोधप्रबंधही प्रकाशित करण्यात आले आहेत. 26 हून अधिक शैक्षणिक संस्था, 65 हून अधिक स्वयंसेवी संस्था व 30 हून अधिक शासकीय संस्थांशी वाईल्ड- सीईआरची नाळ जुळलेली आहे.
वनविभाग आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा
अभयारण्य आणि संरक्षित व्याघ्र प्रकल्पाजवळ असणार्या गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. अशा क्षेत्रात वन्यजीव शिरल्यावर निश्चितच संघर्षाची ठिणगी पेटते. अशा स्थितीत वनकर्मचारी आणि नागरिकांनी काय करायला हवे, संघर्ष कसा टाळावा, स्वत:चे संरक्षण प्राण्यांपासून कसे करावे, प्राणी कसे हाताळायचे, यासाठी (Wild-CER Elgar) वाईल्ड-सीईआर संस्थेचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक कार्य करीत असल्याचे डॉ. बहार बावीस्कर यांनी सांगितले.
स्व. विलास फडणवीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘जिव्हाळा’ या संस्थेद्वारा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार या वर्षी ‘वाईल्ड-सीईआर’ या संस्थेला घोषित झाल्याचा आनंदही डॉ. बहार बावीस्कर यांनी व्यक्त केला.