पैनगंगा नदी स्वच्छता मोहिमेला सुरूवात होणार

10 Jan 2023 20:15:33
बुलडाणा, 
चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात उगम झालेल्या पैनगंगा नदी (Painganga River) स्वच्छता मोहिमेला शनिवार, दि. 14 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. यात पहिल्या फेरीत जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर या तीन तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या सहभागातून नदी स्वच्छ करण्याची मोहीम कोलवड येथून सुरू करण्यात येईल.
  
Painganga River
 
या उपक्रमाच्या नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, समन्वयक नंदकुमार देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चला जाणूया नदीला उपक्रमातून जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे (Painganga River) 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नदीच्या प्रकृतीबद्दल जाणीव जागृती निर्माण करून लोकसहभागागतून नदी स्वच्छता करण्यात येणार आहे. या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
 
 
जिल्ह्यातील पैनगंगा ही नदी (Painganga River) महत्वाची असून या उपक्रमांत जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करण्यात येणार आहे. नदीपात्रात घाण पाणी येऊ नये म्हणून पाणलोट क्षेत्रात शाश्वत कामे करण्यात येणार आहे. तसेच नदीचे पाणी दुषित करणार्‍या घटकांचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे. नदीपात्रात असणारे निर्माल्य, जलपर्णी, झाडेझुडपे काढून स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असेल त्या ठिकाणी जेसीबीच्या सहायाने स्वच्छतेची कामे करण्यात येतील. कचर्‍याचे निर्मुलन करून स्थानिकांच्या मदतीने सुशोभिकरणाचे काम करण्यात येतील. पैनगंगा नदीची स्वच्छता ही नेहमीसाठी सुरू राहणार आहे.
 
 
यासाठी प्रत्येक तालुक्यात नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्हा अव्वल यावा, यादृष्टीकोनातून कामे करण्यात येणार आहे. नदी स्वच्छतेबरोबर याठिकाणी पर्यटनाची सुविधाही विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा लाभ होईल. नदीचे महत्व पटवून देण्यासाठी आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. श्रमदान करताना याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच श्रमदानाच्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक नेमण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले.
 
Powered By Sangraha 9.0