शांती - शक्तीचा समन्वय ... 'शास्त्री' !

    दिनांक :11-Jan-2023
Total Views |
नागपूर, 
Lal Bahadur Shastri : मुगलसराय येथे शारदा प्रसाद श्रीवास्तव आणि रामदुलारी देवी यांच्या पोटी जन्मलेले लाल बहादूर शास्त्री हे 1964 ते 1966 या काळात भारताचे दुसरे पंतप्रधान होते. 1961 ते 1963 या काळात त्यांनी देशाचे सहावे गृहमंत्री म्हणूनही काम केले. 11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूर शास्त्री यांनी हृदयविकाराच्या झटक्याने ताश्कंद येथे अखेरचा श्वास घेतला. तेथे शास्त्री पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती एम अयुब खान यांच्यासोबत युद्धबंदीच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि युद्ध संपवण्यासाठी पोहोचले होते. Lal Bahadur Shastri हे श्वेतक्रांतीसारख्या ऐतिहासिक मोहिमा सुरू करण्यासाठी देखील ओळखले जातात, ज्यामुळे देशातील दुधाचे उत्पादन वाढले. 1965 मध्ये, त्यांनी भारतातील हरित क्रांतीला प्रोत्साहन दिले, ज्याने देशातील शेतकऱ्यांच्या समृद्धीवर आणि भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या कार्यप्रणालीमुळे त्यांना 'शांतीचे प्रतीक' म्हणून ओळखले जाते. कारण त्यांनी नेहमीच आक्रमकतेपेक्षा अहिंसेचा मार्ग पसंत केला. 1966 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशा महान स्वातंत्र्यसैनिकाला त्यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश अभिवादन करतो आहे.
 
Lal Bahadur Shastri
 
लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराय या छोट्याश्या गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्या तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली. लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले. उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली.
 
Lal Bahadur Shastri
 
भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात घोळू लागली. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.
 
ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव 'शास्त्री' असे होते. आणि त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले. 1927 मध्ये Lal Bahadur Shastri यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी ललितादेवी या त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते. 1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती झाली. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.

Lal Bahadur Shastri 
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचे महत्त्व लक्षात आले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती.
 
 
एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची प्रामाणिक वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, शास्त्री यांचा राजीनाम मी स्वीकारत आहे. कारण, यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत. रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले, कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.

Lal Bahadur Shastri 
 
आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले. 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीला जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते. तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान' 'जय किसान' ही घोषणा देशातील 'अन्न टंचाई' दरम्यान सैनिक आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दिली होती. त्यावेळी त्यांनी पगार घेणेही बंद केले होते. आपल्या नम्र स्वभावाने, मृदुभाषी वागणुकीने आणि सर्वसामान्यांशी जोडून घेण्याच्या क्षमतेने त्यांनी भारतीय राजकारणावर अमिट छाप सोडली.