तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Corruption : ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु आदिवासी बहुल असलेल्या पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावात अल्पशिक्षित सरपंच असल्याचा तर काही ठिकाणी महिलाराज असल्याचा तर काही गावात निवडणुका लांबल्याने प्रशासक राज असल्याचा गैरफायदा घेत ग्रामसेवकांनी मोठा घोळ केला आहे. तर या भ्रष्टाचाराची चौकशी लाऊन पठाणी वसुली सुरू झाल्याने ग्रामसेवक आणि अधिकारी यांचा वाद पोलिस ठाण्यापर्यर्ंंत पोहचला आहे. तरीही वरिष्ठ स्तरावर कारवाई होत नसल्याने भ्रष्ट कर्मचारी अधिकारी उथळ माथ्याने वावरत असल्याने भ्रष्टाचार (Corruption) आता शिष्टाचार झाला तर नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.

तालुक्यातील बोटांवर मोजता येणार्या ग्रामपंचायती सोडून इतर ग्रामपंचायती मध्ये 14 व्या आणि 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत मोठा भ्रष्टाचार (Corruption) झाला आहे. करंजी रोड, किन्ही नंदपूर, पढासह अनेक ग्रामपंचायतमधील लाखो रुपयांचा अपहार गाजत आहे. याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे आली असता त्यांनी चौकशीच्या नावाखाली ग्रामसेवकांना वेठीस धरणे सुरू केल्याने हा वाद आंदोलन, निवेदन नंतर मारामारी व पोलिस ठाण्यात तक्रारी पर्यंत पोहचल्याने सर्वांची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. तरीही ग्रामविकास विभाग जागा झाला नाही.
मागील महिन्यात 7 डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी गटविकास अधिकार्यांच्या मनमानी आणि हुकूमशाहीच्या कारभाराविरोधात आलेल्या ग्रामसेवकांच्या तक्रारीवर उपमुख्यकार्यकारी अधिकारी लता मोहिते यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती. समितीला सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देऊनही चौकशी बाबतचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच असल्याने चौकशी समिती संशयाच्या भोवर्यात दिसून येत आहे. याबाबत अनेक ठिकाणाच्या तक्रारी आमदार खासदारांना देण्यात येऊनही लोकप्रतिनिधींची चुप्पीसुद्धा चिंतनाचा विषय ठरली आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक असल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांना जाब विचारण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्याने काही कर्मचारी मस्तवाल बनले आहेत. परंतु यामध्ये ग्रामीण भागाचा विकास खोळंबला असून याकडे कोणाचे लक्ष जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.